आयपीएलमुळे इंग्लंड दौर्‍याआधी भारतीय संघासमोर अडचण   

मुंबई : भारतीय संघाला इंग्लंडचा दौरा करायचा आहे, जिथे त्यांना पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. परंतु त्यापूर्वी भारत-अ संघ तेथे २ सराव सामने खेळणार आहे. या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि भारतीय खेळाडू अडचणीत सापडले आहेत. 
 
खरे तर, भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड कसोटी दौर्‍याच्या तयारीसाठी बीसीसीआय आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. याअंतर्गत, भारत अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन ४ दिवसांचे सराव सामने खेळणार आहे. ईसीबीने पुष्टी केली आहे की, पहिला सामना ३० मे ते २ जून दरम्यान कॅन्टरबरीच्या स्पिटफायर मैदानावर होईल, तर दुसरा सामना ६ ते ९ जून दरम्यान नॉर्थम्प्टनच्या काउंटी मैदानावर खेळवला जाईल.आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आणि भारत अ सामन्यात फक्त ४ दिवसांचा फरक आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल, म्हणजेच आयपीएल संपण्यापासून आणि इंग्लंड दौर्‍याच्या तयारीला सुरुवात होण्यामध्ये फक्त ४ दिवसांचे अंतर असेल. याचा थेट परिणाम आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचणार्‍या खेळाडूंवर होईल. पण, आयपीएलच्या गट टप्प्यातील सामने १८ मे पर्यंत संपतील, त्यामुळे काही खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी आणि तयारीसाठी वेळ मिळेल. परंतु अंतिम फेरीत असणारे खेळाडू पहिल्या ४ दिवसांच्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाहीत.
 
मागील अहवालांनुसार, बीसीसीआय भारत अ संघात संभाव्य कसोटी संघातील खेळाडूंचा समावेश करायचा की स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या तरुणांना संधी द्यायची याबद्दल अजूनही कन्फ्यूज आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये अनेक भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक होती, त्यामुळे बीसीसीआयला बहुतेक खेळाडूंनी इंग्लंडमध्ये लवकर पोहोचावे असे वाटेल जेणेकरून ते तेथील परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतील.
 
पण, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तो भारत अ संघासोबत इंग्लंडला जाऊ शकतो. त्यांचे मत लक्षात घेऊन बीसीसीआय संघ निवडण्याची शक्यता आहे. या सामन्यांमध्ये कसोटी संघातील खेळाडूंना मैदानात उतरवायचे की नवीन प्रतिभावान खेळाडूंना संधी द्यायची हे गंभीरच्या सल्ल्यानुसार ठरवले जाईल.
 

Related Articles