बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन अडचणीत   

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा अशा बड्या स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून दिलेला भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन मोठ्या अडचणीत सापडला आहे. लक्ष्य सेन सध्या २३ वर्षांचा असून त्याचे प्रशिक्षक विमल कुमार आणि प्रकाश पदुकोण आहेत. या खेळाडूने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देशासाठी पदके जिंकली आहेत. लक्ष्यने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. त्याने थॉमस कपमध्येही सुवर्णपदक जिंकले. याशिवाय त्याने आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तसेच युवा ऑलिंपिक स्पर्धेतही त्याच्या नावावर सुवर्णपदक आहे. पण आता वयचोरीच्या प्रकरणात कर्नाटकउच्च न्यायालयाने लक्ष्य सेनविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
लक्ष्य सेनवर वय लपवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लक्ष्य सेनने ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले वय खोटे दाखवल्याचा आरोप आहे. त्याच्या आईवडिलांनी आणि भावाने मिळून त्याचा जन्म दाखला बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्नाटकउच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. लक्ष्य सेनने कर्नाटक उच्च न्यायालयात त्याच्या विरोधात या प्रकरणी करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची मागणी केली होती, पण न्यायाधीश एमजी उमा यांनी त्या याचिका फेटाळून लावल्या. जर प्रथमदर्शनी गुन्ह्याकडे लक्ष वेधणारे पुरावे रेकॉर्डवर ठेवण्यात आले असतील तर तपास थांबवण्याचे किंवा फौजदारी कारवाईची सुरुवात रद्द करण्याचे कोणतेही कारण या प्रकरणात दिसत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले. 
 

Related Articles