खासदारांना भरघोस पगारवाढ   

१ एप्रिल २०२३ पासून २४ टक्के वाढीव वेतन

नवी दिल्ली : लोकसभा व राज्यसभेच्या आजी-माजी खासदारांचे वेतन व भत्त्यांमध्ये तब्बल २४ टक्क्यांची भरघोस वाढ केली. केंद्र सरकारने सोमवारी त्या संदर्भात अधिसूचना जारी केली. विशेष म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने, १ एप्रिल २०२३पासून ही वाढ दिली जाणार आहे.
 
खर्च महागाई निर्देशांकाच्या आधारे केलेल्या या वेतनवाढीमुळे संसद सदस्यांना दरमहा एक लाखाऐवजी १ लाख २४ हजार रुपये वेतन मिळेल. दैनंदिन भत्ताही दोन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये आणि माजी खासदारांचे निवृत्ती वेतन दरमहा २५ हजारहून ३१ हजार रुपये करण्यात आले आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेचे सदस्य राहिलेल्या माजी खासदारांना त्यानंतरच्या सेवेसाठी प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त निवृत्तीवेतन प्रतिमहा २ हजारांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे. यापूर्वी एप्रिल २०१८मध्ये खासदारांसाठी वेतन व भत्तावाढ करण्यात आली होती.
 
खासदारांना मतदार संघातील खर्चासाठी प्रतिमहा ७० हजार, कार्यालयीन भत्ता ६० हजार तसेच, संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दैनंदिन भत्ता २ हजार रुपये दिला जातो. या भत्त्यामध्येही वाढ केली जाणार आहे. खासदारांना दिल्लीमध्ये सरकारी निवासस्थान दिले जाते. ५० हजार युनिट वीज व ४ हजार लिटर पाणी मोफत दिले जाते.
 

Related Articles