बांगलादेशात विद्यार्थी नेते आणि लष्करात वादाला सुरवात   

दत्तात्रय जाधव 

बांगलादेशात शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी आणि लष्कर यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. लष्करप्रमुख जनरल वकार उझ-जमान यांची भूमिका शेख हसीना यांना मदत करण्याची असल्याचे बोलले जाते. त्याच पार्श्वभूमीवर एका वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने जनरल वकार यांना पायउतार करण्यासाठी बंड केले होते, मात्र ते अयशस्वी ठरले. तरीही, आता बांगलादेशात सत्तांतराचे वारे वाहू लागले आहेत. 
 
लष्करात गटबाजी 
  
बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख युनूस खान आणि देशातील राजकीय युतीबाबत बांगलादेश लष्करात दोन गट पडले आहेत. यापैकी एक गट जमात-ए-इस्लामीसारख्या आयएसआयशी संबंधित घटकांना समर्थन देतो आणि दुसरा अवामी लीगशी संबंधित आहे. या गटांमुळे लष्करातील तणाव अधिकच वाढला आहे.
 
लष्करप्रमुखांविरुद्ध कारस्थान 
 
बांगलादेश लष्करातील लेफ्टनंट जनरल मोहम्मद फैजुर रहमान आणि लष्करप्रमुख जनरल वकार उझ-जमान यांच्यातील मतभेदांमुळे अस्थिरता वाढली आहे. अलीकडेच फैजुर यांच्या नेतृत्वात वकार विरोधी लष्करी अधिकार्‍यांनी  त्यांना हटविण्यासाठी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो असफल झाला. लष्करातील काही अधिकारी वकार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.  वकार यांच्याकडे भारताचे समर्थक म्हणून पाहिले जाते.  
 
फैजुर रहमान यांच्यावर पाळत 
 
पाकिस्तानशी जवळचे संबंध असलेले फैजुर रहमान यांच्यावर लष्करात सत्तापालट करण्याच्या कथित कारस्थानाबद्दल नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. लष्करप्रमुख वकार यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. फैजुर यांनी वकार यांच्या विरोधात लष्करी अधिकार्‍यांच्या बैठका बोलावल्या होत्या. तथापि, लष्करप्रमुखांच्या सचिवालयाला या बैठकीबद्दल माहिती मिळाली आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना इशारा देण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी या बैठकीतून माघार घेतली.
 
लष्कराला देशात हवी शांतता
 
बांगलादेशमध्ये निर्वाचित सरकार स्थापन होईपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कर सक्रिय भूमिका बजावेल. सुरक्षा दलांना शिस्तीने आणि  जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला आहे. बळाचा वापर टाळण्याबाबतही  त्यांना सांगण्यात आल्याचे लष्करप्रमुख वकार यांनी सांगितले. दरम्यान, वकार यांच्या या वक्तव्यावरून लष्कराला देशातील परिस्थिती शांततेत हाताळायची आहे, असे सूचित होते.
 
निवडणुका पुढे ढकलण्यासाठी...  
 
फैजुर रहमान हे पाकिस्तानच्या आयएसआय प्रमुखाला भेटल्याचा आरोप आहे. लष्कर प्रमुख वकार यांच्याविरोधातले हे कारस्थान मानले जात आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने या घडामोडींना निवडणुका पुढे ढकलण्याचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे.
 
युनूस सरकारवर लष्करप्रमुख नाराज 
    
लष्कर प्रमुख जनरल वकार हे महम्मद युनूस यांना हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त करण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी युनूस यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. युनूस यांच्या कार्यकाळात भारतासोबतचे संबंध बिघडले; पण अमेरिकेसोबतची परिस्थितीही फार चांगली राहिली नाही. लष्कराला देशावर आपली पकड मजबूत करण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असे वकार यांनी म्हटले आहे.
 
सत्तापालट होणार? 
 
लष्कर आणि हंगामी सरकार यांच्यातील वाढत्या तणावामुळे बांगलादेशच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बांगलादेशच्या आधीच डळमळीत झालेल्या लोकशाही रचनेला सध्याची परिस्थिती पोषक नाही. ढाक्यामध्ये सैन्याच्या वाढत्या हालचाली आणि चिलखती वाहनांच्या तैनातीमुळे बांगलादेशात सत्तापालट होणार की काय, या अटकळांना आता आणखी खतपाणी मिळाले आहे. सत्तापालट झाल्यास देशातील राजकीय अस्थिरता वाढू शकते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची जोरदार टीका होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.

Related Articles