छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवादी शरण   

रायपूर : छत्तीसगढमधील विजापूर जिल्ह्यात ११ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ६ नक्षलवाद्यांसह एकूण २२ नक्षलवाद्यांनी रविवारी शरणागती पत्करली.  
शरण आलेल्या आयतू पुणेम, पांडू कुंजाम, कोसी तमो, सोना कुंजाम आणि लिंगेश पदम या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस होते, तर तिब्रुराम मडवी याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. पुणेम हा प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेच्या आंध्र-ओडिशा बॉर्डर विभागांतर्गत प्लाटून क्रमांक एकचा सदस्य म्हणून सक्रिय होता. पांडू आणि तामो हे अनुक्रमे प्लाटून क्रमांक ९ आणि १० चे सदस्य होते. सोना नक्षलवादी संघटनेच्या तेलंगणा राज्य समितीअंतर्गत प्लाटून पार्टीचा सदस्य होता. तर मडवी हे जनता सरकारचे प्रमुख होते, लखमा कडती दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष होते. दरम्यान, या वर्षी आतापर्यंत विजापूरमध्ये १०७ नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकली आहेत. ८२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे आणि १४३ नक्षलवाद्यांना पकडण्यात आले आहे.  विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका वाहनाला उडवून देण्यासाठी स्फोट घडवून आणला. यात दोन सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाले. 

Related Articles