निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल   

अपयशी संस्था असल्याचा आरोप 

नवी दिल्ली : निवडणूक आयोग अत्यंत अकार्यक्षम आणि नापास संस्था असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी रविवारी केला. आयोग राज्यघटनेनुसार दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत नाही. त्यामुळे बहुतांश नागरिकांचा विश्वास आयोगाने गमावल्याचा आरोपही त्यांनी केला 
 
कपिल सिब्बल यांनी पीटीआयला एका मुलाखत दिली. त्यात त्यांनी आयोगाच्या कामकाजावर कोरडे ओढले आहेत. आयोगाच्या विश्वासाहर्तेचा मुद्दा तातडीने सुटला तर, लोकशाहीला वाचविण्याच्या संधी वाढेल. निवडणूक आयोग अकार्यक्षम असल्याचे सांगताना ते म्हणाले, राज्यघटनेला अपेक्षित अशा जबाबदारीनुसार तो काम करत नाही. ते काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने उपस्थित केलेल्या मतदान यादीतील अनियमिततेच्या प्रश्नावर उत्तर देत होते. 
 
निवडणूक आयोग एक अपयशी संस्था असल्याचा उल्लेख करताना ते म्हणाले,  बहुतांश नागरिकांचा आयोगावरील विश्वास उडाला आहे. तो परत प्राप्त करण्यासाठी पावले उचलली तर लोकशाही जीवंत ठेवण्याच्या संधी अधिक वाढतील. विरोधी पक्षांनी मतदान यंत्रातील त्रुटीबाबतच्या गंभीर विषयाकडे अनेकदा आयोगाचे लक्ष वेधले आहे. एकंदरीत निवडणूक प्रक्रियाच प्रदूषित झाल्याचे दिसते. निकाल जाहीर झाले खरे. पण, त्यात अनेक पातळीवर गैरप्रकार अधिक झाल्याचे दिसते. या विषयावर सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी मतदार यादीतील नावे काढणे आणि नावांची संख्या अचानक वाढणे तसेच एकाच क्रमांकाच्या ओळखपत्राचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर ते बोलत होते. 

Related Articles