जळगावात मालमोटारीची तीन रिक्षांसह दुचाकींना धडक   

एक ठार; तिघे गंभीर

जळगाव : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर मालमोटारीचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे मालमोटार उतारावरून रिव्हर्स आली. पाठिमागे असलेल्या तीन रिक्षांसह पाच दुचाकींना या मालमोटारीने चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्त मालमोटार सुरत रेल्वे गेटजवळील माल-धक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या भरून उड्डाणपुलावरून जात होती. उड्डाणपुलावरील काही अंतर पार केल्यानंतर अचानक मालमोटारीचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे मालमोटार उतारावरून मागच्या बाजूने रिव्हर्स येऊ लागली. मालमोटार पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. 
 
शिवाजीनगर उड्डाणपुलाशेजारी असलेल्या रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह तेथील चार ते पाच दुचाकींना मालमोटारीने चिरडले. यात रिक्षांसह दुचाकी पूर्णपणे दबल्या गेल्या. या अपघातात तिन्ही रिक्षा आणि दुचाकींचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. सुरेश ओस्वाल (वय ५०, रा. राधाकृष्णनगर, जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रुपेश गोपाल चौधरी (वय ४३, रा. वरणगाव, ता. भुसावळ) आणि आशा बानो यांच्यासह अन्य दोघे जखमी असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मालमोटार मालकाने अपघातग्रस्त वाहन धारकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधितांनी केली आहे.

Related Articles