मार्केटयार्डाला वाहतूक कोंडीचा विळखा   

एजन्सी बदलूनही परिस्थिती ‘जैसे थे’

पुणे : राज्यातील दुसर्‍या क्रमाकांची बाजारपेठ म्हणून मार्केटयार्डातील बाजाराची ओळख आहे; मात्र अलीकडच्या काळात वाढलेल्या वाहतूक कोंडीचा व्यापारावर परिणाम होत आहे. त्याचा फटका शेतकर्‍यांसह आडत्यांनाही सहन करावा लागत आहे. सुरक्षा रक्षकांची नेमणूक करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. 
 
मार्केटयार्डातील वाहतूक कोंडीसह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी नुकतीच सुरक्षा एजन्सी बदलली आहे; मात्र त्याचाही काही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे. बाजारात आणि मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली असताना सुरक्षा रक्षक एकाच ठिकाणी थांबून असतात. त्यांच्यावर कोणी कारवाई करत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढतच जाते. 
 
पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून मार्केट यार्डात भाजीपाला, गुळ-भुसार विभागात शेतमाल चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. वाढलेल्या चोर्‍यांमुळे बाजार घटक हैराण झाले होते. आता प्रशासनाने शासनाच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाकडे सुरक्षेची जबाबादारी दिली आहे. मात्र, बाजारात दररोज वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोंडीच्या ठिकाणी प्रत्यक्ष सुरक्षा रक्षक नसतात. केवळ प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांचा घोळका दिसतो. मात्र, बाजारात ठिकठिकाणी नित्याची होणारी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसते. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार कधी? असा प्रश्न  बाजार घटक उपस्थित करत आहेत. 
 
वाहतूक कोंडी सुटत नाही. याबाबतची महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बलाने आपली जबाबदारी झटकली आहे. त्यांनी बाजार समिती प्रशासनावर याचे खापर फोडले आहे. बाजार आवारात बलाकडून कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाई करत असताना सातत्याने वरिष्ठांचे फोन येतात, आरोप केला आहे. याबाबतचे पत्रदेखील त्यांनी बाजार समितीला दिले आहे.

Related Articles