इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजी बससेवेला प्राधान्य   

२५ टक्के बस वाढवण्याचा निर्णय | चार्जिंग स्थानकाबाबत प्रश्नचिन्ह

पुणे : वारंवार विस्कळीत होणारी विद्यृत यंत्रणा, चार्जिंगसाठी होणारा विलंब, तांत्रिक बिघाड अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक बसची संख्या कमी करून सीएनजीवर आधारीत बसची संख्या वाढविण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. असे असले तरी दुसरीकडे दोन इलेक्ट्रीक चार्जिंग स्थानके नव्याने सुरू करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या दुहेरी कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
  
पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीच्या मार्गांवर दैनंदीन पीएमपी धावत असतात. पीएमपीच्या ताफ्यातील एक हजार ९५४ बसपैकी ४९० बस इलेक्ट्रीक आहेत. या इलेक्ट्रीक बससाठी पुणे रेल्वे स्थानक, भेकराईनगर, वाघोली, बाणेर आणि निगडी या पाच ठिकाणी इलेक्ट्रीक चार्जिंग डेपो कार्यरत आहेत. मात्र, वारंवार विस्कळीत होणारी विद्यृत यंत्रणा, तांत्रिक दुरुस्ती, चार्जिंगसाठी लागणारा विलंब अशा कारणांमुळे प्रवाशांच्या प्रतीक्षेचा कालावधी चांगलाच वाढत असल्याचे कारण समोर आल्याने पीएमपी प्रशासनाने ताफ्यात २५ टक्के सीएनजी बस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
  
इलेक्ट्रीक बसमधील काही बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड, नादुरूस्ती, आयुर्मान संपलेल्या बसदेखील कार्यरत आहे. त्यामुळे शहरातील विविध मार्गावरून धावताना अचानक बस बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून वाहतूक कोंडीसारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, या बसच्या चार्जिंगसाठीही विलंब होत असल्याने याचा परिणाम फेर्‍यांवर होत आहे. वेळापत्रक कोलमडून प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा फेर्‍याही रद्द करण्याची नामुष्की पीएमपीवर येत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पीएमपी प्रशासनाने ईलेक्ट्रीक बसच्या वापराऐवजी जास्तीजास्त सीएनजीवर आधारित बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
नव्याने दोन चार्जिंग डेपो 
 
आर्युमान संपलेल्या इलेक्ट्रीक बस, नादुरूस्त बस तातडीने ताफ्यातून काढून टाकत एकूण इलेक्ट्रीक बसच्या संख्येपैकी २५ टक्के बस या सीएनजीवर आधारित घेण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रीक बसची संख्या कमी करण्यात येत असताना पीएमपीने हिंजवडी आणि भेकराईनगर येथे नव्याने इलेक्ट्रीक दोन चार्जिंग डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
पीएमपीच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस राहणार आहेत. केवळ सद्य स्थितीला निर्माण होत असलेल्या समस्येच्या पार्श्वभूमीवर उपायोजना आखण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक चार्जिंग डेपो आहेत. त्या ठिकाणी जवळच्या मार्गांवर या बस चालविण्याबाबत नियोजन करण्यात येईल. 
- दीपा मुधोळ मुंडे, व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष, पीएमपी

Related Articles