मुलाच्या खुनातील तपास अधिक महत्त्वाचा   

वडिल अभियंत्यास कोठडी 

पुणे : पत्नीशी होणारे वारंवार वाद, तसेच चारित्र्याच्या संशयाच्या रागातून अभियंता असलेल्या आरोपी वडिलाने पोटच्या तीन वर्षाच्या मुलाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. हा गुन्हा गंभीर असून अधिक धागेदोरे मिळविण्यासाठी या प्रकरणाचा अधिक तपास महत्वाचा आहे, असा युक्तीवाद तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात केला. संगणक अभियंत्याला न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी हा निकाल दिला. 
   
माधव साधूराव टेकेटी (वय २८, रा. चंदननगर) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपी वडिल संगणक अभियंत्याचे नाव आहे. माधव एका 
माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीस होता. त्याला दोन महिन्यांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरुन त्याचे पत्नीसोबत नेहमी वाद होत असत. गुरुवारी दुपारी माधव हा मुलीला शाळेतून घेऊन येतो, असे सांगून तो तीन वर्षांच्या मुलाला आपल्या सोबत घेऊन घराबाहेर पडला.
 
दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणार्‍या बसमधून मुलगी घरी परतली. मात्र, माधव हा मुलासोबत रात्री घरी परतलाच नाही. त्यामुळे पत्नीने रात्री उशिरा चंदननगर पोलीस ठाण्यात पती आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन माधवला ताब्यात घेतले. तपासात त्याने रागाच्या भरात आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिली असल्याचे उघड झाले. 
  
माधवला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याने स्वत:च्या मुलाचे अपहरण करुन त्याचा खून केला. त्याने चाकू कोठून आणला? यादृष्टीने तपास करायचा आहे. त्याने गुन्हा करताना वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. मुलाचा खून केल्यानंतर त्याने अंगावरील कपडे कोठे टाकून दिले? या अनुषंगाने सुध्दा अधिक तपास करायचा असल्याने त्याला अधिकची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी युक्तिवादात केली. न्यायालायने माधवला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

Related Articles