नाट्यगृहातही आता मराठी चित्रपट   

प्रा. मोरे प्रेक्षागृहात आजपासून दोन दिवसांचा चित्रपट महोत्सव

पिंपरी : पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठी चित्रपट असोसिएशनच्या पुढाकाराने जानेवारी महिन्यात मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते. हीच संकल्पना आता पिंपरी-चिंचवडमध्येदेखील अमलात आणण्यात येणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (सोमवार) आणि उद्या (मंगळवार) सलग दोन दिवस मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे.
 
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे नवीन मराठी चित्रपट पाहण्यासाठी पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. नाट्यगृहातील पहिल्या चित्रपट महोत्सवात हाऊस फुलचे बोर्ड झळकले. ही संकल्पना प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त पंकज पाटील यांनी पुढाकार घेऊन मराठी चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव कौस्तुभ कुलकर्णी यांच्या समवेत सकारात्मक चर्चा केली.मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनाला चालना या बहुउद्देशीय संकल्पनेतून मराठी चित्रपट असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही. 
 
प्राईम टाईम मिळण्यात अडचणी येतात. या सर्वांमुळे मराठी चित्रपटाची खूप मोठी कोंडी झाली आहे. मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचविण्याची हक्काची जागा नसल्याने मराठी चित्रपट निर्मात्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. विविध अडचणींवर मात करण्यासाठी मध्यंतरी बाबासाहेब पाटील, अभिनेत्री गार्गी फुले यांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नाट्यगृहात मराठी चित्रपट दाखविण्याबाबत निवेदन देऊन प्रस्ताव मांडला होता. त्यांनी या संकल्पनेला मंजुरी दिल्यानंतर मराठी चित्रपट असोसिएशनतर्फे २२ आणि २३ जानेवारीला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला सुमारे १० ते १२ हजार रसिक प्रेक्षकांनी भेट दिली होती.
 
या सर्व महोत्सवाचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला. तसेच राज्य शासनाने मराठी चित्रपट नाट्यगृहात कायमस्वरूपी दाखवण्यासाठी शासन आदेश काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मराठी चित्रपट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. राज्यातील बहुतांश नाट्यगृहांत शनिवार, रविवार वगळता इतर दिवशी नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ज्या वेळी नाट्यगृह रिकामे असतील त्या वेळी नाट्यगृहात मराठी चित्रपट दाखविले जावेत, म्हणून नाट्यगृहात चित्रपट ही संकल्पना पुढे आली आहे.

Related Articles