चांदी अधिक चमकणार!   

अभिजित अकोळकर 

सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंचे आकर्षण ग्राहकांंमध्ये, विशेषत: भारतीय महिलांमध्ये पूर्वीपासून आहे. जगभरातील शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे या धातूंमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याकडे ओढा अधिक वाढणार आहे. चांदीच्या दराने प्रति किलोमागे १ लाखांचा टप्पा अगोदरच ओलांडला. भूराजकीय परिस्थिती पाहता चांदीला मागणी अधिक वाढणार हे वेगळे सांगायला नको. 
 
एका वर्षांत चांदीचे दर सुमारे ३४ टक्के वाढले आहेत. चांदीची किंमत नुकतीच एक लाखांवर गेली आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढत चालली आहे. यामुळे चांदीला मोठा आधार मिळाला आहे. सोने-चांदीचे उच्च गुणोत्तर दर्शविते की सोन्याच्या तुलनेत चांदीचे मूल्य अजूनही कमी आहे. पुरवठ्याशी संबंधित इतर अनेक घटकांमुळे चांदीच्या किमतीत आणखी वााढ होण्याची शक्यता आहे. 
 
सोन्या-चांदीचे गुणोत्तर काय आहे?
 
सोने-चांदीचे गुणोत्तर सध्या ८९:१ च्या पातळीवर आहे, जे त्याच्या ७०:१ च्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. एकंदरीत चांदी अजूनही सोन्यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे चांदीच्या किंमत मोठी झेप घेऊ शकते. सोन्याची किंमत प्रति औंस ३ हजाराच्यावर गेली तर चांदी प्रति औंस ५० पर्यंत पोहोचू शकते. इतिहासात डोकावले आणि शेअर बाजारातील उलाढाल पाहता चांदी सोन्यापेक्षा चांगली कामगिरी करेल.
 
अमेरिकेतील दर कपातीचा परिणाम?
 
अमेरिकेतील महागाई दरात घट झाल्यामुळे फेडरल रिझर्व जून २०२५ पर्यंत व्याजदरात आणखी कपात करण्याची शक्यता आहे. व्याजदरात कपात केल्याने अमेरिकन डॉलर कमकुवत होतो, ज्यामुळे सोने आणि चांदीसारख्या धातूची मागणी वाढते. पर्यायाने चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल अधिक वाढणार आहे. त्यामुळे किंमतही वाढण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत.  
 
औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढली
 
औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढत चालली आहे.  त्यामुळे किंमत देखील वाढत आहे.  चांदीची औद्योगिक मागणी आणखी वाढण्याचा अंदाज आहे. चांदीचा वापर प्रामुख्याने सोलार पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि अन्य तंत्रज्ञान निर्मितीत मोठा होतो. सोलर पॅनल उत्पादनात दरवर्षी ८० दशलक्ष औंस चांदी लागते, तर प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनांसाठी २५-५० ग्रॅम एवढी चांदी लागते. चीन आणि अमेरिकेने अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे  धोरण राबविले आहे. त्यामुळे भविष्यात  चांदीची मागणी आणखी वाढणार आहे. 
 
चीनच्या धोरणांचा प्रभाव
 
चीन चांदीचा जगातील सर्वात मोठा औद्योगिक ग्राहक आहे. त्चीनने आर्थिक विकास दराला गती देण्यासाठी नवीन आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. त्यात मुख्य भर सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि सेमीकंडक्टर्सचे उत्पादन वाढवण्यावर असेल. चीन सरकारने सौरऊर्जेच्या विस्तारासाठी खर्च वाढविला आहे, ज्यामुळे क्षेत्रात चांदीचा वापर पूर्वीपेक्षा अधिक वाढणार आहे. 
 
चांदीच्या पुरवठ्याची समस्या
 
केडिया अ‍ॅडव्हायझरीच्या अहवालानुसार, जागतिक बाजारात चांदीच्या पुरवठ्यात सलग पाचव्या वर्षी घसरण झाली आहे. २०२५ मध्ये मागणीच्या तुलनेत चांदीच्या पुरवठ्यात १४९ दशलक्ष औंसचा तुटवडा आहे. खाणकामाद्वारे चांदी काढली जात असली तरी २.४ टक्के वाढती मागणी पूर्ण ते करु शकत नाहीत तांबे आणि जस्त यांसारख्या धातूंच्या खाणकामात ७२ टक्के चांदी उप-उत्पादन म्हणून काढली जाते, ज्यामुळे त्याचे उत्पादन वाढवणे कठीण होते. याव्यतिरिक्त, मेक्सिकोत चांदीच्या उत्पादनादरम्यान अयस्क ग्रेडमध्ये १५ टक्के घसरण होत आहे. ज्यामुळे पुरवठा कमी होत आहे असून उत्पादनाचा खर्च मात्र वाढत चालला आहे.
 
भू-राजकीय तणावाचा परिणाम
 
जागतिक पातळीवर २०२५ मध्ये भौगोलिक-राजकीय तणाव वाढल्याने चांदीची मागणीत वाढ झाली आहे. अमेरिका आणि युरोपियन महासंघात व्यापार युद्धाला तोंड फुटले आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील हमास आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळेही गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जेव्हा आर्थिक बाजार अस्थिर असतात, तेव्हा सुरक्षित पर्यायांच्या शोधात गुंतवणूकदार सोन्या-चांदीकडे हमखास वळतात. त्यामुळे येत्या काही महिन्यांत चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर चांदीची औद्योगिक मागणी, पुरवठ्याची कमतरता, भौगोलिक-राजकीय तणाव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे व्याजदरातील कपातीची शक्यता चांदीच्या दरवाढीला कारणीभूत ठरणार आहे. 
 
(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

Related Articles