शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका...   

अंतरा देशपांडे 

मार्च महिना म्हटलं की आपसूकच सगळेजण, मग तो व्यापारी वर्ग असो किंवा नोकरदार वर्ग, सगळ्यांची आर्थिक वर्षाची कामे, गुंतवणूक, पॉलिसी प्रीमियम भरणे इत्यादींची गडबड चालू होते. कुठे काही सुटत नाही ना? याची फेर तपासणी सगळेच करतात आणि ३१ मार्च (आर्थिक वर्षाच्या शेवटचा दिवस) च्या आत सर्व कार्ये संपवतात. 
 
यावेळेस मात्र सगळ्यांनी ही महत्त्वाची नोंद घेणे गरजेचे आहे की हे आर्थिक वर्ष व्यावहारिकदृष्ट्या २८ मार्चलाच संपणार आहे. कारण २९ आणि ३० मार्च ला शनिवार-रविवार आला असून, ३१ मार्चला रमझान ईदची सुट्टी आहे. शनिवारी बँकेचे कामकाज जरी सुरू असले तरी मुच्युअल फंड किंवा शेअर बाजार त्या दिवशी बंद असल्याने या दोन्हीशी निगडित कुठलीही गुंतवणूक किंवा व्यवहार होऊ शकणार नाही. पुन्हा लागून मोठी सुट्टी आल्याने बँकेत गर्दी आणि शेवटच्या क्षणी इंटरनेट बँकिंगमध्ये अडथळे हे अगदीच साहजिक आहेत.
 
येत्या १० दिवसांत सर्व आर्थिक वचनबद्धता पूर्ण झाल्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी काही मुद्दे -
 
१) तुमच्या उत्पन्नातून वेळोवेळी झालेली उद्गम कर कपात (टीडीएस) हा बरोबर आहे की नाही आणि तोच २६एएसमध्ये बरोबर दिसत आहे ना?
२) तुमचा आयुर्विम्याचा हप्ता तुम्ही भरला आहे का?
३) मेडिक्लेमचे नूतनीकरण झाले आहे ना? हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण जर ठराविक वेळेत ती रिन्यू केली गेली नाही तर खूप मोठा फटका बसू शकतो आणि आत्तापर्यंतचा जमा झालेल्या बोनसवर देखील पाणी सोडावे लागते.
४) ह्या वर्षाचा पीपीएफ भरणा राहिला असेल तर तो भरणे अनिवार्य आहे. एखाद्या वर्षी पीपीएफ भरणा राहिला तर त्यावर दंड भरावा लागतो.
५) जर तुम्ही जुन्या कर प्रणालीची अंमलबजावणी करणार असाल तर १,५०,०००/- पर्यंतची बचत केली आहे की नाही हे बघणे ही गरजेचे आहे. यासाठी वरील सर्व गुंतवणूक झाल्यावर काही शिल्लक असलेली रक्कम ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही पूर्ण १,५०,०००/- चा फायदा घेऊ शकता.
६) आत्तापर्यंत झालेल्या उत्पन्नावर तुम्ही वेळोवेळी आगाऊ कर (अ‍ॅडव्हान्स टॅक्स) भरला आहे का? तुम्ही जर तो स्वतः भरत असलात तर तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला सगळी आकडेवारी सांगून एकदा तपासून घेणे गरजेचे आहे.  
७) कोणी एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याची वार्षिक रक्कम भरली आहे ना?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कुठली कर प्रणाली (जुनी का नवीन) जास्त फायदेशीर आहे हे बघणे गरजेचे आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की नोकरी करणार्‍या व्यक्तींना दरवर्षी कर प्रणालींमध्ये बदल करण्याचा पर्याय दिला जातो, परंतु व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न मिळवणारे करदाते आयुष्यात फक्त एकदाच कर प्रणालींमध्ये बदल करू शकतात.
 
अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २४ मध्ये ७२ टक्के करदाते नवीन कर प्रणालीकडे वळले आणि मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात जाहीर केलेल्या बदलांनंतर या आर्थिक वर्षात ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
 
(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

Related Articles