नदीसुधार प्रकल्पासाठी झाडांची कत्तल   

उद्यान विभागाची परवानगी घेतली नसल्याचे उघड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पिंपळे निलख, विशालनगर परिसरात नदीकाठच्या जागा ताब्यात न घेता नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्‍हास सुरू आहे. नदीच्या मूळ पात्रात बदल करून काँक्रीटीकरण, लॅन्डस्केपिंग, सळई टाकून सिमेंटची भिंत, नदीकाठची सगळी झाडे तोडली जात आहेत. दगड, माती आणि मुरुम नदीत टाकून जैवविविधता संपुष्टात आणली जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
 
याबाबत वृक्षप्रेमी नागरिकांनी उद्यान विभागाकडे झाडांची कत्तल केल्याने परवानगी घेतली आहे का? याविषयी विचारणा केली. पण नदीसुधार कामासाठी वृक्षतोडीची कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीवर आक्षेप घेत ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे उशिरा जागे झालेल्या उद्यान विभागाकडून नदी सुधार प्रकल्पाची पाहणी करण्यास सुरुवात केली. पिंपळे निलख स्मशानभूमी या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी संबंधित ठेकेदाराने रस्ता तयार केला आहे. या ठिकाणचे लहान-मोठे असे १२ वृक्ष तोडल्याचे दिसून आले. यामध्ये काटेरी बाभूळ, सुबाभूळ, करंज, उंबर, विलायती चिंच आदींचा समावेश होता. उद्यान विभागाकडून याचा पंचनामा केला आहे.
 
दरम्यान, नदीसुधार प्रकल्पाचे काम सुरू असताना वृक्षतोड करण्यास महापालिकेच्या उद्यान विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही संबंधित ठेकेदाराकडून पिंपळे निलख, विशालनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करूनदेखील उद्यान विभागाच्या कर्मचार्यांना केवळ १२ झाडे तोडल्याचे निदर्शनास आले आहे.
 
पर्यावरणप्रेमींची दिशाभूल
 
महापालिकेने मुळा नदीसुधार प्रकल्प राबविताना ठेकेदार कंपनीकडून पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांची चक्क दिशाभूल केली आहे. नदीसुधार प्रकल्पात पर्यावरण नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असून, नदीपात्र पूर्वीपेक्षा अरुंद केले आहे. नदीकाठची झाडे तोडली जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने नदीतील जैवविविधता देखील संपुष्टात आणल्याचा आरोप केला जात आहे.
 
नदीकाठ ओसाड
 
महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून मुळा नदीसुधार प्रकल्प राबविला जात आहे. मुळा नदीकाठाची लांबी १४.२० किलोमीटर इतकी आहे. महापालिकेने पिंपळे निलख, विशालनगर परिसरात नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. मुळा नदीचे पात्र स्वच्छ व सुंदर व्हावे आणि शहर पर्यटनास चालना मिळावी याकरिता नदीसुधार प्रकल्प राबविला जात आहे. मात्र ठेकेदाराने नदीसुधार प्रकल्पासाठी पिंपळे निलख, विशालनगर नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ठेकेदारांकडून वृक्षाची कत्तल केल्याने नदीकाठ ओसाड झाला आहे. उद्यान विभागाची परवानगी न घेताच वृक्षतोड केल्याने वृक्षप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.
 
नदीचे पात्र झाले अरुंद
 
नदी सुधार प्रकल्पाचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीकडून पिंपळे निलख, विशालनगर येथील मुळा नदीकाठावरील झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जात आहेत. काही झाडे मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली आहेत. नदीपात्रात माती, दगड, मुरुम टाकून नदीचे पात्र पूर्वीपेक्षा अरुंद केले आहेत. नैसर्गिक पाण्याचे झरे सुरू न ठेवता नदीपात्रात तब्बल आठ ते दहा फूट खोल खड्डा काढून सिमेंट काँक्रीट टाकून ते सपाटीकरण केले जात आहे. त्याशिवाय नदीतच सिमेंटची भिंतदेखील बांधली जात आहेत.

Related Articles