महापालिका खरेदी करणार ५५ लाखांचे रुमाल आणि फाईली   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन एक-दोन हजार नव्हे तर, तब्बल ५० हजार लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि पांढर्‍या अशा रंगीबेरंगी रुमालांची खरेदी करणार आहे. त्यासाठी तब्बल ५५ लाख १२ हजार ५०० रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हे रुमाल महापालिका कामकाजाच्या फाईली आणि कागदपत्रांचे गठ्ठे बांधण्यासाठी वापरले जाणार आहेत.
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पेपरलेस कामकाज सुरू करणार असल्याचे महापालिका प्रशासन अनेक वर्षांपासून ओरडून सांगत आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी काही होताना दिसत नाही. त्याचा मुहूर्त लागत नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या टेबलांवरील फाईलींचे ढीग कमी होताना दिसत नाहीत. टेबलावर जास्त फाईलींचा ढीग म्हणजे अधिकार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण, असा गैरसमज महापालिका वर्तुळात आहे. शेकडो फाईली कशा ओळखायच्या यासाठी विविध रंगांच्या रूमालांमध्ये त्या गुंडाळून ठेवल्या जातात. अधिक महत्त्वाची, मध्यम महत्त्वाची, नियमित, कमी महत्त्वाची फाईल, त्या त्या रंगांच्या रूमालात बांधून ठेवली जाते. ती महापालिकेची जुनी परंपरा आहे. त्यात अद्याप खंड पडलेला नाही. महापालिकेच्या विविध विभागांच्या फाईली व कागदपत्रांचे गठ्ठे बांधण्यासाठी लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि पांढर्‍या रंगाच्या रूमालांचा वापर केला जातो.
 
फाईलींचा ढीग मोठा प्रमाणात असल्याने त्यासाठी तब्बल ५० हजार रुमालांची आवश्यकता आहे. प्रत्येक रंगाचे दहा हजार रुमाल खरेदी करण्यात येत आहेत. एका रुमालाची किंमत ११० रुपये २५ पैसे आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता थेट महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून ते खरेदी करण्यात येणार आहेत. ही खरेदी मध्यवर्ती भांडार विभागाकडून करण्यात येत आहे. खरेदीनंतर हे रूमाल सर्व विभागांना वितरित केले जातील.

Related Articles