रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम   

चेन्नई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघानं चेन्नई सुपर किंग्जच्या चेपॉकच्या स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील आयपीएलच्या मोहिमेला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. 
 
मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला. खलील अहमदने त्याला चौथ्या चेंडूवर शिवम दुबे करवी झेलबाद केले. पदरी भोपळा पडल्यामुळे रोहितच्या नावे लाजिरवाण्या कामगिरीची नोंद झाली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला. 
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १८ वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम याआधी दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सेवल या दोघांच्या नावे होता. त्यांच्या पंक्तीत आता रोहित शर्माही जाऊन बसला आहे. रोहित शर्मावर १८ व्या वेळी आयपीएल स्पर्धेत शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. 
 
रोहित शर्माशिवाय मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करणार्‍या  रायन रिकल्टन यालाही खलील अहमद याने १३ धावांवर त्रिफळा उडविला. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात घरवापसी करणार्‍या अश्विन याने विल जॅक्सला ११ धावांवर तंबूचा रस्ता दाखत मुंबई इंडियन्सला पाचव्या षटकातच तिसरा धक्का दिल्याचेही पाहायला मिळाले.   आयपीएलच्या गत हंगामात रोहित शर्माला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये त्याने संघाला विजय मिळवून देणारी खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ७६ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकवला होता. ही खेळी यंदाच्या आयपीएल हंगामात त्याला बूस्ट देणारी ठरेल, अशी अपेक्षा होती.

Related Articles