न्यूझीलंडचा मालिका विजय   

बे ओव्हल : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा सामना तौरंगा येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला, जिथे पाकिस्तानला लाजिरवाणा पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात सुरुवातीला पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी माती खाल्ली आणि नंतर फलंदाजांनी नांगी टाकली. या पराभवासह, पाकिस्तान संघाने मालिकाही गमावली आहे, कारण न्यूझीलंडने ३-१ अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.
 
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने २० षटकांत ६ गडी गमावून २२० धावा केल्या. यादरम्यान, टिम सेफर्ट आणि फिन ऍलन यांनी संघाला धमाकेदार सुरुवात दिली. टिम सेफर्टने २२ चेंडूत ४४ धावांची खेळी केली, ज्यामध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याच वेळी, फिन ऍलनने फक्त १९ चेंडूत अर्धशतक झळकावले, जरी पुढच्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. यानंतर, मायकेल ब्रेसवेलने नाबाद ४६ धावा आणि डॅरिल मिशेलने २९ धावा करत संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
 
दुसरीकडे, पाकिस्तानकडून हरिस रौफ सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत २७ धावा देऊन ३ फलंदाजांचे बळी घेतले. त्याच वेळी, अबरार अहमदने २ आणि अब्बास आफ्रिदीने १ विकेट घेतली. पण शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान सर्वात महागडे ठरले. दोन्ही गोलंदाजांनी त्यांच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये प्रत्येकी ४९ धावा दिल्या.लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरूवात खूपच खराब झाली. कारण कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही आणि त्यांनी एकामागून एक विकेट गमावल्या.पाकिस्तानचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर न्यूझीलंडने सामन्यावर पूर्णपणे कब्जा केला आणि पाकिस्तानला काही वेळातच ऑलआउट केले. पाकिस्तान फक्त १६.२ षटके खेळू शकला आणि १०५ धावा करून ऑलआऊट झाला.

Related Articles