वाचक लिहितात   

शासकीय पदभरती कधी?
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फेररचना आणि कार्यपद्धतीत सुधारणा याविषयी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केलेली घोषणा स्वागतार्ह आहे; मात्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल घेतले जात असलेले आक्षेप याबद्दल सरकार काय करणार? हा खरा प्रश्न आहे. उच्च पदाच्या नोकर्‍या मिळाव्यात यासाठी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी पुण्यात येतात. भरपूर अभ्यास करतात; पण काही ठराविक जागांच्या भरतीसाठी जाहिराती काढल्या जातात. प्रत्यक्ष लेखी परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीद्वारे उत्तीर्ण होऊन आणि निवड होऊनही वर्ष-सहा महिनेच काय दोन-दोन वर्षेे झाली तरी त्यांना नियुक्ती दिली जात नाही. त्यामुळे उमेदवाराच्या भवितव्याशी खेळण्याचाच हा प्रकार ठरतो. लोकसेवा आयोगाची कार्यपद्धती सुधारणे आवश्यक आहेच. पदभरतीची प्रक्रियादेखील गतिमान झाली पाहिजे. फडणवीस सरकार याबाबत काय करणार? हा खरा प्रश्न आहे. पदभरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या तातडीने केल्या पाहिजेत.
 
जयंत पतंगे, अहिल्यानगर
 
परमेश्वराशी स्वतःला जोडा
 
या विश्वावर नियंत्रण ठेवणारी, या विश्वाला चालविणारी, या विश्वातील विविध घडामोडी घडवणारी अद्भुत शक्ती निश्चितच आहे. कोणी मानो अगर ना मानो ती परमेश्वररूपी अदभुत शक्ती आहेच. अशा या अद्भुत शक्तीचे अस्तित्व संपूर्ण जगताने मान्य केलेले आहे व करीत आहे. या शक्तीची जाणीव प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपात किंवा प्रसंगात होतच असते; मात्र बर्‍याच जणांना हे उमजत नाही. दुःखात किंवा जीवघेण्या प्रसंगात या अद्भुत शक्तीचे नामस्मरण सर्वांनाच आठवते. वर आकाशाकडे बोट दाखवून सर्वच म्हणतात उपरवालेकी मर्जी मग असे जर सर्वच मानतात तर मग त्या अद्भुत अशा परमेश्वररूपी शक्तीशी आपण स्वतःला का जोडून घेऊ नये? परमात्मा-परमेश्वर आहे, याचे भान ठेवत जीवनाच्या मार्गावर चालावे, तरच जीवन आनंदी, सुखमय होईल.
 
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर
 
मातृभाषेतून शिक्षण घेणे योग्य
 
शाळेत जाण्यापूर्वी मुलांच्या घरी बोलली जाते त्याच भाषेतून त्यांना शिक्षण मिळाले तर ती मुले चांगली शिकू शकतात. घरच्या भाषेतून मजबूत प्रभाव पडलेला नसतो किंवा ती भाषा पुरेशी अवगत झालेली नसते. या कारणांनी दुसर्‍या भाषेत शिकताना न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. शिवाय प्रत्येक मुलाची शिक्षण घेण्याची क्षमता वेगवेगळी असल्याने शिक्षणाच्या मूळ विषयात आकलन करून घेण्यात तफावत निर्माण होते. मातृभाषेत शिकणारी वय वर्षे ६ ते ८ या वयोगटातील मुले ही मातृभाषेपेक्षा वेगळ्या भाषेत शिकणार्‍या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करतात. मातृभाषेतील शिक्षणासंबंधी युनेस्कोने भाषा बाब - बहुभाषिक शिक्षणावरील जागतिक मार्गदर्शन या अहवालात असा दावा केला आहे. मुलांना मातृभाषेत शिकविण्यास सुरुवात केल्यावर काही दिवसांत मुलांचे वाचन कौशल्य पूर्वीपेक्षा सुधारले गेल्याचे युरोप आणि आफ्रिकेत दिसून आले. मातृभाषेत जर मूलभूत शिक्षण दिले गेले तर त्यांना इतर भाषा शिकणे सोपे जाते; परंतु आपल्या मुलाला जगात मोठ्या प्रमाणात प्रचलित असणार्‍या इंग्रजी या माध्यमातून शिक्षण देण्याचा विचार पालक करीत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतात. भारतात अशी परिस्थिती इतर देशांपेक्षा जास्त प्रमाणात आहे. युनेस्कोने जगभरातील शाळा, मुलांची शिक्षणाची भाषा आणि त्यात साधली जाणारी प्रगती यांचा विचार करून संशोधनात्मक मते अहवालात मांडली आहेत. पालकांनी त्यांचा विचार करून आपल्या मतांचा फेरविचार करायला हरकत नाही.
 
स्नेहा राज, गोरेगांव.
 
निसर्गाचा र्‍हास थांबवा
 
निसर्गाचा र्‍हास थांबायला हवा! उन्हाळ्याच्या दिवसांत डोंगररांगांना वणवे लागून पर्यावरणाची हानी होताना दिसत आहे. निसर्गाचा र्‍हास थांबणार कधी? असा प्रश्न पडला आहे. या प्रश्नांकडे गांभीर्याने पहाण्याची गरज आहे. वनस्पती हेच आपले जीवन आहे आणि आपले जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्षांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.
 
संतोष दत्तू शिंदे, काष्टी, श्रीगोंदे
 
अंतराळवीरांचा दुर्दम्य आशावाद
 
अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेले दोन अंतराळवीर तब्बल ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर सुखरूप परत आले. त्यांनी या काळात दाखवलेल्या धैर्याचे आणि त्यांच्या धाडसाचे कौतुकच केले पाहिजे. त्यांच्या परतीचा प्रवास ठरल्याप्रमाणे पार पडला. कोणतीही अडचण त्यात आली नाही, अशा अचूक नियोजनाबद्दल संपूर्ण शास्त्रज्ञांच्या पथकाचेही अभिनंदन केले पाहिजे. त्या दोन अंतराळवीरांनी ९ महिन्यांच्या काळात त्यांना नेमून दिलेली कामे आणि प्रयोग पार पाडले. अंतराळ स्थानकाची देखभाल, जुनी उपकरणे बदलणे, स्थानकाची स्वच्छता यांसारखी कामे त्यांनी पार पाडली. अंतराळ स्थानकात ६२ तास ६ मिनिटे चालणार्‍या सुनीता विल्यम्स या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. तब्बल ९ महिने एका अनिश्चिततेच्या वातावरणात आपले मनोबल टिकवणे हे या दोन्ही अंतराळवीरांपुढील मोठे आव्हान होते. त्यांचा दुर्दम्य आशावादी दृष्टिकोन यासाठी उपयोगी ठरला आहे. दोन्ही अंतराळवीरांच्या चिकाटीला सलाम.
 
गोकुळ देशपांडे, नेवासे

Related Articles