महायज्ञासाठी आलेल्या पुरोहितांवर गोळीबार   

शिळ्या अन्नावरून ७० जणांना मारहाण 

चंडीगढ : हरयानातील कुरुक्षेत्र येथे महायज्ञात सहभागी होण्यासाठी आलेल्या पुरोहितांवर आयोजकांच्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. यात लखनौहून आलेले पुरोहित आशिष तिवारी जखमी झाले. यामुळे संतापलेल्या पुरोहितांचा आयोजकांनी नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीच्या सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला. यावेळी ७० पुरोहितांना सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. यात लखीमपूर येथील रहिवासी प्रिन्स शुक्ला यांच्यासह २० ते २२ पुरोहित जखमी झाले.
 
प्रयागराजच्या हरिओम बाबा यांनी १००८ कुंडीय यज्ञ आयोजित केले आहेत. यामध्ये १००८ पुरोहितांना पाचारण करण्यात आले आहे. उज्जैन, बनारस, वृंदावन, लखनौ, लखीमपूर आणि दमोह येथील ब्राह्मणही यज्ञशाळेत आले आहेत. त्यांचा आरोप आहे की, त्यांना येथे शिळे अन्न दिले जात आहे. शिळे अन्न खाण्यास विरोध केल्याने सुरक्षा रक्षकांनी पुरोहितांना काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर विटा फेकण्यात आल्या. जवळपास ७० पुरोहितांना मारहाण केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. यात एकजण जखमी झाला. 
 
या घटनेनंतर पुरोहित यज्ञशाळेतून बाहेर आले आणि त्यांनी तोडफोड आणि दगडफेक सुरू केली. पुरोहितांनी महायज्ञशाळेचे मुख्य द्वार तोडले. रस्त्यावरील बॅनरही फाडण्यात आले. त्यानंतर त्यांनी थीम पार्कच्या बाहेर कुरुक्षेत्र-कैथल रस्ता रोखला. त्यांनी तेथून जाणारी वाहने जबरदस्तीने थांबवण्यास सुरुवात केली.घटनेची माहिती मिळताच कुरुक्षेत्र पोलिस तिथे पोहोचले. पोलिसांनी पुरोहितांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून त्यांना हाकलून लावले. शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे. 

Related Articles