दुधेबावीत लांडग्याचा हल्ला   

 सात जण जखमी

सातारा, (प्रतिनिधी) : दुधेबावी येथील बोरकरवाडीपरिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांवर लांडग्याने हल्ला केला. यात सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सजाबाई तुकाराम नाळे (वय-७०), निखिल मच्छिंद्र नाळे (वय-१२), चित्रा चिमणराव सोनवलकर (वय-४५), जनाबाई अंकुश साळुंखे (वय-६५), संतोष अप्पा साळुंखे (वय-५५), दादासाहेब तांबे (वय-२८), छाया जनार्दन चांगण (वय-५५, सर्व रा. दुधेबावी, ता. फलटण) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, मोगराळे घाटात परिसरात शेतकरी शेताची कामे करीत असताना लांडग्याने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर जखमींना तातडीने फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी पिसाळलेल्या लांडग्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर वन विभागाने लांडग्याचा शोध सुरू केला आहे.

Related Articles