अजित पवार, जयंत पाटील यांची बंद दाराआड चर्चा   

‘एआय’वर चर्चा झाल्याचा अजित पवारांचा दावा

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शनिवारी बंद दाराआड चर्चा झाली. भेट आणि बंद दाराआड चर्चा झाल्याने या भेटीचे अनेक अर्थ राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. या भेटीत केवळ कृषी क्षेत्रातील एआयच्या वापराबाबत चर्चा झाली असल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. 
 
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक काल आयोजित करण्यात आली होती. या बैठकीआधी अजित पवार आणि जयंत पाटील यांची बंद दाराआडची भेट झाली. अजित पवार म्हणाले, कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढविण्यासाठी एआयचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील समितीत जयंत पाटील यांचा समावेश आहे. त्यांना काही सूचना करायच्या होत्या. त्या ऐकून घेण्यासाठी ही भेट होती. 
 
भेटीत केवळ एआयवर चर्चा झाली. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग देऊ नये, असा खुलासा पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीला येताच अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या इतर जणांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते. तसेच सुरक्षारक्षक आणि स्वीय सहायक यांनाही केबिनबाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी विविध नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही एका उद्योगपतीच्या घरी भेट झाली होती. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले असले तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट आपल्यासोबत यावा, यासाठी अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी यासाठी आपल्याला आवाहन केल्याचा दावा नुकताच जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात दोन्ही गट एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles