माझे मंत्री असते, तर समज दिली असती   

अक्षेपार्ह वक्तव्यावर अजित पवारांची नितेश राणेवर टीका 

पुणे : औरंगजेबाच्या कबरीबाबत माझ्या मंत्र्यांनी अक्षेपार्ह विधान केले असते,  तर मी त्याला समज दिली असती. मात्र दुसर्‍या मंत्र्यांनी वक्तव्य केले, तर फडणवीस आणि शिंदेंच्या कानावर घालेन. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर नाव न घेता शनिवारी टीका केली. 
 
एका कार्यक्रमानिमित्त अजित पवार पुण्यात आले होते. त्यानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह सर्व महापुरुषांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. अशावेळी नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कोणीच करू नये. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम सर्वांचेच आहे. सरकारचे जास्त आहे. माझ्यासहित सर्वांनी हे केले पाहिजे. माझ्या मंत्र्यांनी अक्षेपार्ह विधाने केल्यास मी त्यांना सांगेन पण दुसर्‍या मंत्र्यांनी बोलले तर फडणवीस आणि शिंदेंना सांगावा लागेल, असेही स्पष्ट केले. 
 
राज्यभरात औरंगजेबाची कबर काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. कबर हटाव मोहीम दरम्यान या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्यांकडूनही कबर हटाव मोहिमेला पाठिंबा दिसून येत आहे. तर विरोधकांकडून टीका टिपणी केली जात आहे. अशातच आमदार नितेश राणे यांनी ‘कबर पाकिस्तानात पाठवून द्या’ असे औरंगजेबच्या कबरीबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या वक्तव्यावर अजित पवार यांनीसुद्धा नाव न घेता राणेंवर टीका केली आहे.  
 
काय म्हणाले होते राणे 
 
महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून संपवले. त्याची कबर आपल्याकडे कशाला पाहिजे. काही लोकांना ती मोठी आठवण वाटते. ती आम्हाला हिंदू समाज म्हणून नको आहे. कोणाला ती पाहिजे असेल तर पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावे. तीच भावना मी आज व्यक्त केली आहे. आमचे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विचारांचे कार्यकर्ते पूर्ण समाज बोलतोय की, ती कबर महाराष्ट्रात नको. ती भावना आपल्याला कळायला हवी. म्हणून राज्यभर हे आंदोलन होत आहे. 

Related Articles