सैन्य दलात भरतीसाठी ’युगांतर २०४७’चे आयोजन   

सैन दल व पुनीत बालन ग्रुपचा पुढाकार  

पुणे : राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकून सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुण्यात ’युगांतर २०४७’ चे येत्या मंगळवारी (ता.२५) गणेश कला क्रिडा मंच येथे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सैन्य दल पुणे आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार आहे. 
  
या उपक्रमात प्रसिद्ध संस्थांमधील सुमारे ३ हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा उपक्रम युवा, योग आणि तंत्रज्ञान या थीमवर केंद्रित असणार आहे. या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचे प्रेरक व्याख्याने, भारतीय सैन्यात सामील होण्याबाबत माहिती, विविध सत्रे, उमेदवारांच्या  प्रवासातील अनुभवांची देवाण- घेवाण, वक्त्या जया किशोरी यांचे विशेष प्रेरक व्याख्यान, आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे शस्त्र प्रदर्शन, प्रशंसित मानस तज्ज्ञ अमित कलंत्री यांचे मन वाचण्याचे सादरीकरण केले जाणार आहे. या उपक्रमात राष्ट्र उभारणीकडे या प्रेरणादायी चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे. 
  
’युगांतर २०४७’ हा केवळ एक उपक्रम नसून आजच्या तरुणांना भारतीय सैन्याच्या नीतिमत्तेशी जोडण्यासाठी, त्याची मूल्ये समजून घेण्यासाठी आणि राष्ट्रसेवेच्या संधी शोधण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ आहे. भारताचे भविष्य घडवण्यासाठी शिस्त, नेतृत्व आणि नवोपक्रमाचे महत्त्व हा उपक्रम अधोरेखित करतो. या उपक्रमात एनडीएचे विद्यार्थी त्यांचे अनुभव कथन करणार असून भारतीय संस्कृतीची झलक दाखविण्यासाठी वक्त्या जया किशोरी यांचे व्याख्यान होणार आहे. 

Related Articles