एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला   

हल्लेखोराचा आत्महत्येचा प्रयत्न

राजगुरुनगर, (वार्ताहर) : एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून वीस वर्षीय तरुणीवर नात्यातीलच अठ्ठावीस वर्षीय तरुणाने चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहराजवळील पडाळवाडी येथे घडली. हल्लेखोर तरुणाने स्वतःवरही चाकूने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली. ही घटना शुक्रवारी घडली.
 
शुभम अनिल खांडगे (वय-२८, रा. पिंपळगाव वाणी, ता. जुन्नर) असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्लेखोर तरुण हा पीडित तरुणीचा दूरचा नातेवाईक आहे. राजगुरुनगर शहराजवळील पडाळवाडी येथील एका इमारतीतील सदनिकेत पीडित तरुणी आपल्या आईसोबत राहण्यास आहे. हल्लेखोर शुभमचे या कुटूंबाकडे नियमित येणे-जाणे होते. गुरुवारी रात्री तो त्यांच्याचकडे जेवण करून हॉलमध्ये झोपला. त्यापूर्वी लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाले होते. शुक्रवारी सकाळी पीडित तरुणी सदनिकेच्या स्वच्छतागृहामध्ये अंघोळीला गेली असता शुभम याने दरवाज्यावर लाथा मारून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. अंघोळ करणार्‍या पीडित तरुणीवर चाकूने हल्ला केला. ’तू माझ्याशी लग्न करत नाही, मी तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणत त्याने तिच्या पोटावर, मानेवर चाकूने सपासप वार केले.
  
या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. चाकूच्या हल्याने तरुणी रक्तबंबाळ झाली होती. बचावासाठी तरुणीची आई आली असता तिच्या हातावरसुद्धा वार करून जखमी केले. शेजारील नागरिक मदतीसाठी आले असता त्यांच्यावरही हल्लेखोराने हल्ला केला. यानंतर हल्लेखोराने स्वतःच्या गळ्यावर वार करून स्वतःला गंभीर जखमी करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप सिसोदे करत आहेत.

Related Articles