विनोद कुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार   

नवी दिल्ली : ज्येष्ठ हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना शनिवारी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंंदी साहित्यातील अनमोल योगदानाची दखल घेतली असून त्यांची ५९ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. छत्तीगसढचे रहिवासी आहेत. त्यामुळे छत्तीसगढला प्रथमच त्यांच्या रुपाने पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. विनोद कुमार शुक्ला ८८ वर्षांचे असून लघुकथा लेखक, कवी आणि विश्लेषक आहेत. हिंदीतील नामवंत साहित्यिक, कवी असा त्यांचा लौकीक असून ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते १२ हिंदी साहित्यिक ठरले आहेत. ११ लाख रुपये रोख, विद्येची देवी सरस्वतीची ब्राँझ धातूची मूर्ती,  असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्ञानपीठ निवड समितीच्या अध्यक्षा प्रतिभा राय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीने विनोद कुमार शुक्ला यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. 
 
विनोद कुमार शुक्ला छत्तीसगढचे पहिले हिंदी साहित्यकार आहेत. ज्यांना प्रथमच ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या हिंदी साहित्यातील योगदानाची दखल घेऊन पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे ज्ञानपीठ निवड समितीने सांगितले. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये महादेव कौशिक, दामोदर माऊझो, प्रभा वर्मा, अनामिका ए कृष्णा राव, प्रफुल्ल शिलेदार, जानकी प्रसाद शर्मा आणि ज्ञानपीठचे संचालक मधुसूदन आंनंद यांचा 
समावेश आहे. शुक्ला यांची भाषाशैली आकर्षक आणि भावनेला हात घालणारी आहे. यापूर्वी १९९९ मध्ये त्यांचे पुस्तक दीवर में एक खिडकी रहती है ! याला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांची कादंबरी नौकरी की कमिझ ( १९७९) गाजली होती. त्यावर मणी कौल यांनी चित्रपट तयार केला होता. त्यांचा कवितासंग्रह सब कुछ होना बचा रेहेगा (१९९२) प्रसिद्ध आहे. दरम्यान, १९६१ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. पहिला पुरस्कार मल्याळम कवी जी. संकरा कुरुप यांना १९६५ मध्ये त्यांच्या कवितासंग्रह ओडक्कुझल ला दिला होता.
 
लेखन करणे छोटे काम नाही. तुम्ही सातत्याने लिहित राहा, आत्मविश्वासाने लिहित राहा. तुमचे साहित्य प्रकाशित झाल्यानंतर त्याबाबत पाठपुरावा करत राहा. साहित्यावरील प्रतिक्रियांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.
- विनोद कुमार शुक्ला

Related Articles