गतविजेत्या केकेआरवर आरसीबीचा विजय   

कोलकाता : केकेआरच्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला फिल सॉल्टने धडाकेबाज सुरुवात करून दिली. सॉल्ट बाद झाल्यावर विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावल्यामुळे केकेआरच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना १७४ धावा करता आल्या होत्या. पण आरसीबीने या आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत सात विकेट्स राखून सामना जिंकला. विराट कोहलीने यावेळी नाबाद ५९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. 
 
आरसीबीला यावेळी फिल सॉल्टने तुफानी सुरुवात करुन दिली. सॉल्ट वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तुटून पडला आणि त्याच्या एकाच षटकात १७ धावांची लूट केली. त्यानंतर सॉल्टने दमदार अर्धशतकही झळकावले. पण वरुण चक्रवर्तीला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. पण सॉल्टने त्यापूर्वी धमाकेदार फलंदाजी करत ३१ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. सॉल्ट बाद झाला आणि त्यानंतर विराट संघासाठी तारणहार ठरला.
 
अजिंक्यने यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. अजिंक्यला यावेळी सुनील नरिनची चांगली साथ मिळाली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळेच संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. अजिंक्य बाद झाल्यावर अन्य फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही, त्यामुळे केकेआरला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही आणि त्यांनी १७४ धावा केल्या.आरसीबीच्या संघाकडून यावेळी कृणाल पंड्याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर जोश हेझलवूडने दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.

Related Articles