औटघटकेचे पंतप्रधान?   

चर्चेतील चेहरे , राहुल गोखले 

कॅनडाच्या नव्या  पंतप्रधाना बद्दलची  प्रतीक्षा अखेर संपली आहे. घसरणारी लोकप्रियता आणि परिणामतः पदत्याग करण्याचा पक्षांतर्गत दबाव यामुळे जस्टीन त्रुदो यांनी गेल्या जानेवारी मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यांनतर त्यांचा उत्तराधिकारी कोण ठरणार याची उत्सुकता होती. लिबरल पक्षाच्या नेतेपदाच्या स्पर्धेत मार्क कार्नी यांनी बाजी मारली आणि आता ते कॅनडाचे पंतप्रधान झाले आहेत.  त्यांना अशा काळात हे पद मिळाले आहे जेंव्हा अमेरिकेचा कॅनडावर  दबाव वाढत आहे. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर जादा आयात शुल्क लादले आहे; तर दुसरीकडे कॅनडाने अमेरिकेमध्ये विलीन व्हावे असा त्यांचा आग्रह  आहे. कॅनडात लिबरल पक्षासमोर प्रतिस्पर्धी कंझर्वेटिव्ह पक्षाचे प्रबळ आव्हान आहे. तेंव्हा तारेवरची कसरत करीत कार्नी यांना पंतप्रधान म्हणून कारभार करावा लागणार आहे यात शंका नाही.
 
अर्थात कार्नी मात्र निश्चिन्त आहेत किंवा वरकरणी तरी ते तसे भासवत आहेत. लिबरल पक्षाच्या नेतेपदाच्या स्पर्धेत वाद चर्चेत (डिबेट) त्यांनी ‘संकटावर कशी मात करायची असते हे आपल्याला पक्के ठाऊक आहे’ असा दावा केला होता. वास्तविक कार्नी हे काही रूढ अर्थाने राजकारणी नाहीत.  खासगी क्षेत्रात आणि नोकरशाहीत दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी असला तरी मंत्रिपदी किंवा राजकीय-सार्वजनिक पदावर त्यांनी आजवर काम केलेले नाही. एरवी ही उणीव समजली गेली असती. पण कॅनडा सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे; अशा वेळी लिबरल पक्षाला रूढ अर्थाने राजकारणी नसलेल्या तरीही शासकीय वर्तुळाच्या नजीक असलेल्या व्यक्तीवर जास्त भरवसा वाटला असावा. त्रुदो यांच्या राजीनाम्याला जे आणखी एक निमित्त ठरले होते ते होते त्यांच्या अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी दिलेला राजीनामा. लिबरल पक्षाच्या  नेतेपदाच्या स्पर्धेत फ्रीलँड यांच्यासह तीन प्रतिस्पर्ध्यांना मात देत कार्नी यांनी निर्विवाद विजय मिळविला. 
 
ते राजकारणात सक्रिय होणार अशा वावड्या गेल्या काही काळापासून उठत होत्याच; पण स्वतः कार्नी त्याबद्दल निःसंदिग्धपणे कोणताही खुलासा करीत नव्हते. २०२१ मध्ये   त्यांना याविषयी विचारण्यात आले होते तेंव्हा ’आपण कदापि नाही असे कदापि म्हणत नाही’ असे उत्तर त्यांनी दिले होते. करोना काळात कॅनडाला बसलेल्या आर्थिक फटक्यानंतर त्यातून देशाला सावरायचे कसे या विषयावर ते त्रुदो यांचे सल्लागार होते. तरीही त्रुदोे पंतप्रधानपदी असेपर्यंत कार्नी यांनी राजकारणात येणे टाळले. त्रुदो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देताच त्यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतली.
 
कार्नी हे अभ्यासक आहेत; ’टेक्नोक्रॅट’ आहेत; राजकारणात यशस्वी होण्यासाठी लागणार्‍या करिश्म्याचा त्यांच्यापाशी अभाव आहे असे म्हटले जाते. त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. कॅनडाच्या फोर्ट स्मिथ गावात जन्मलेले कार्नी यांचे आई-वडील दोघेही शिक्षक. वडील एका माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. घरात पुस्तकांचा  भरणा होता; अनेक विषयांवर चर्चा देखील घरात होत असे. हे सगळे संस्कार कार्नी यांच्यावर झाले. ते सहा वर्षांचे असताना हे कुटुंब एडमंटन येथे स्थायिक झाले. कार्नी यांचे शिक्षण तेथेच झाले. नंतर  त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात अर्ज केला आणि त्यांना तेथे केवळ प्रवेशच मिळाला असे नाही तर शिष्यवृत्ती देखील मिळाली. कॅनडामध्ये बर्फावर खेळाला जाणारा हॉकी क्रीडाप्रकार लोकप्रिय. कार्नी हेही आईसहॉकी खेळत आणि हार्वर्ड तेथील संघाचे ते गोलरक्षक होते. कार्नी यांना हार्वर्डमध्ये प्रख्यात अर्थतज्ज्ञ जे के गॅलब्रेथ अध्यापक म्हणून लाभले. हार्वर्डनंतर कार्नी ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी गेले. तेथे ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेच; पण डॉक्टरेट देखील केली. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीस सुरुवात झाली.
 
कार्नी यांनी त्यापुढील दहा वर्षे गोल्डमन सॅक्स संस्थेत काम केले. त्याद्वारे त्यांचे वास्तव्य टोकियो, न्यू यॉर्क, लंडन, टोरोंटो अशा शहरांत राहिले. २००३ मध्ये ते कॅनडात परतले आणि त्यांची सनदी अधिकारी म्हणून कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाला अव्याहतपणे धुमारे फुटत राहिले. प्रथम ते  कॅनडाच्या मध्यवर्ती बँकेत डेप्युटी गव्हर्नर बनले. वर्षभरातच त्यांची नेमणूक अर्थ मंत्रालयात उपसहयोगी उपमंत्रीपदी करण्यात आली. त्या पदावर असताना जी-७ परिषदेत त्यांनी कॅनडाचे प्रतिनिधित्व केले होते. २००७ मध्ये ते पुन्हा मध्यवर्ती बँकेत परतले. तेंव्हा त्यांना प्रथम बँकेच्या गव्हर्नरच्या सल्लागारपदी नेमण्यात आले. त्यानंतर वर्षभरातच त्यांना मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदी बढती देण्यात आली. तेंव्हा त्यांचे वय ४३ वर्षांचे होते आणि कॅनडा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासातील ते दुसरे सर्वांत तरुण गव्हर्नर ठरले. तोही काळ नेमका जागतिक मंदीचा होता. मात्र अर्थतज्ञ असलेल्या कार्नी यांनी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यात मोलाची भूमिका साकारली. त्या पदावर ते पाच वर्षे होते.
 
त्याचवेळी ब्रिटनचे तत्कालीन अर्थमंत्री जॉर्ज ओसबॉर्न हे ‘बँक ऑफ इंग्लंड’च्या गव्हर्नरपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेत होते. ऑक्सफर्डमध्ये शिकलेल्या कार्नी यांची त्यांनी त्यासाठी निवड केली. २०१३ मध्ये त्या पदावर विराजमान झाले, ‘बँक ऑफ इंग्लंड’च्या तीनशे वर्षांच्या इतिहासात ते पहिलेच बिगर-ब्रिटिश गव्हर्नर ठरले. त्यांनी बँकेला शक्य तितके आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काळात त्या बँकेच्या वृत्तांना माध्यमांतून ठळक प्रसिद्धी मिळू लागली; जी तत्पूर्वी क्वचितच मिळत असे. कार्नी यांच्याच काळात ब्रिटनमध्ये प्लॅस्टिक चलन व्यवहारात आले आणि कागदी चलनाला सोडचिठ्ठी देण्यात आली. 
 
कार्नी अशा काळात मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व करीत होते जेंव्हा ब्रेक्झिटचे वारे ब्रिटनमध्ये वाहत होते. किंबहुना युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यास ब्रिटनला मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा त्यांनी ब्रेक्झिटवरील सार्वमताच्या पार्श्वभूमीवरच दिल्याने ते काहीसे वादग्रस्तही ठरले होते. ‘बँक ऑफ इंग्लंड’मध्ये सुमारे सात वर्षांची कारकीर्द झाल्यानंतर कार्नी काही काळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या वित्त आणि हवामान कृती कार्यक्रमांचे विशेष दूत होते.  स्वित्झर्लंडस्थित ‘फायनान्शियल स्टॅबिलिटी’ संस्थेचे प्रमुखपद त्यांनी सांभाळले. जागतिक स्तरावर बँकिंग प्रणालीला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. ‘ब्रुकफील्ड मालमत्ता व्यवस्थापन संस्थे’शी ते निगडित होते आणि जेंव्हा त्या संस्थेच्या मुख्यालयाचे स्थलांतर टोरोंटोहून न्यू यॉर्कला करण्यात आले तेंव्हा कार्नी टीकेचे धनी ठरले. या निर्णयात त्यांचा हात होता आणि त्याचा परिणाम म्हणून कॅनडाने रोजगार गमावला अशी टीका त्यांच्यावर झाली. मात्र आपला त्या संस्थेशी संबंध संपल्यानंतर तो निर्णय घेण्यात आला असा खुलासा कार्नी यांनी केला होता.
 
गेल्या दोन-चार वर्षांत कार्नी यांचा कल सक्रिय राजकारणाकडे वळत असल्याचे संकेत मिळत होतेच; आता कार्नी यांनी संदिग्धता ठेवलेली नाही. कॅनडाचे ते चोविसावे पंतप्रधान झाले आहेत. आव्हानात्मक काळात नेतृत्वाची संधी हे बहुधा कार्नी यांचे प्रारब्धच दिसते. आताही कॅनडासमोर अनेक आव्हाने असताना त्यांच्याकडे नेतृत्व आले आहे. 
 
कार्नी हे लेखक आहेत आणि त्यांचे ’व्हॅल्यूज’हे पुस्तक २०२१ मध्ये प्रकाशित झाले . त्यात त्यांनी समाजाच्या गरजांची उपेक्षा करून केवळ लाभ-केंद्रित भांडवलशाही व्यवस्था स्वीकारण्याच्या मनोवृत्तीवर हल्ला चढविला आहे. ‘टाइम’ मासिकाने त्यांचा समावेश २०१० मध्ये शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला होता. वयाच्या पन्नासाव्या वर्षी पूर्ण लंडन मॅरेथॉन धावणारे कार्नी यांची आता राजकीय मॅरेथॉनमध्ये कसोटी लागणार आहे. याचे कारण एक तर ते संसद सदस्य नाहीत. त्यामुळे ते पंतप्रधान राहू शकणार असले तरी संसदेच्या कामकाजात किंवा तेथे मतदानात भाग घेता येणार नाही. त्यामुळेच निर्धारित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुका ते अलीकडे ओढू शकतात अशी वदंता आहे.
 
तरीही त्यांची समस्या संपत नाही. याचे कारण त्यांचा लिबरल पक्ष लोकप्रियतेच्या फुटपट्टीवर घसरत चालला आहे. निवडणुकीत लिबरल पक्ष पराभूत झाला तर कार्नी पंतप्रधान राहू शकणार नाहीत. किंबहुना ते औटघटकेचे पंतप्रधान ठरण्याचाच संभव जास्त. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर राहिल्याने कॅनडाच्या चलनी नोटांवर त्यांची स्वाक्षरी आहे.कॅनडाच्या राजकारणावर ते आपला ठसा उमटवितात का हे समजण्यास आता घोडामैदान फार दूर नाही!

Related Articles