मणिपूरच्या शांततेसाठी नागरिकांनी एक व्हावे   

न्यायाधीश गवई यांचे आवाहन

इंफाळ : मणिूपूरमध्ये शांतता नांदावी, यासाठी नागरिकांनी एक व्हावे, असे आवाहन सर्वोच्च न्ययालयाचे न्यायाधीश बी. आर. गवई यांनी शनिवारी केले.न्यायाधीश गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीश काल मणिपूरच्या दौर्‍यावर आले. राज्यातील वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथे शांतता आणि सौहार्द निर्माण व्हावा, यासाठी न्याायाधीश मणिपूर दौर्‍यावर आले आहेत. त्यावेळी गवई बोलत होते. गवई यांच्यासह अन्य न्यायाधीशांमध्ये विक्रम नाथ, एम. एम. सुदर्शन आणि के. व्ही. विश्वनाथन यांचा सामावेश होता. त्यांनी चुरचंदपूर जिल्ह्यातील पुनर्वसन केंद्राला भेट दिली आणि पाहणी केली. निर्वासितांची विचारपूस केली. या वेळी न्यायाधीशांच्या हस्ते लमका येथे कायदेशीर आणि वैद्यकीय सुविधा देणार्‍या शिबिराचे उद्घाटन आभासी पद्धतीने झाले. त्यांनी सचिवालयातून त्यांचे औपचारिक उद्घाटन केले.. या प्रसंगी मणिपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. कृष्णकुमार आणि गोलमेई गायफुलशिलू उपस्थित होते. 
 
या प्रसंगी झालेल्या मेळाव्यात गवई म्हणाले, राज्यघटनेने सर्व भारतीयांना समान हक्क आणि अधिकार दिले आहेत. राज्यात शांतता आणि सौहार्द नांदावे, यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कार्यकारी अध्यक्ष या नात्याने गवई यांनी या प्रसंगी पुनर्वसनाचे साहित्य खरेदीसाठी अडीच कोटी रुपये मंजूर केले. यापूर्वी प्राधिकरणाने दीड कोटी याच कामासाठी दिले होते. प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी १०९ वैद्यकीय शिबिरे कार्यरत आहेत. हिंसाचारावेळी शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश द्यावा, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी शैक्षणिक आणि सार्वजनिक संस्था यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. 
 
दरम्यान, दौर्‍यासाठी शुक्रवारी इंफाळ येथे आलेल्या न्यायाधीशांचे स्वागत राज्यातील वकिलांनी विमानतळावर केले. नंतर सर्वजण सद्भावना मंडप येथील पुनर्वसन केंद्रात गेले. तेथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. या प्रसंगी आरोग्य कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.  ४१ वकिलांना सनद देण्यात आली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. 
 
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी इंफाळ खोर्‍यात आणि पर्वतीय भागांत मे महिन्यामध्ये वांशिक हिंसाचार उफाळून आला होता. कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसाचार झाला. त्यात २५० पेक्षा अधिक जणांचा बळी गेला होता. 
 

Related Articles