दंगलखोरांकडून नुकसान वसूल करणार : फडणवीस   

नागपूर हिंसाचार प्रकरणी कठोर कारवाई

मालमत्ता जप्त करुन  प्रसंगी बुलडोझरही चालविणार

नागपूर : नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात सहभागी असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला. दंगलीत झालेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल केली जाणार आहे. नुकसान भरपाई दिली नाही तर, संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार असून प्रसंगी बुलडोझरची करवाई देखील केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
 
नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी  काल नागपूरमध्ये वरिष्ठ पोलिसअधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, नागपूरमध्ये १९९२ नंतर दंगलीसारखी कोणतीही मोठी घटना घडली नाही. त्यामुळे आता या दंगलखोरांना आता सरळ केले नाही तर त्यांना सवय पडेल. त्यामुळे कारवाई करताना पोलिस कोणतीही दयामाया दाखविणार नाहीत. 
 
ते म्हणाले, पोलिसांनी चार-पाच तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या सगळ्यात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, नागरिकांनी मोबाइलवर केलेले चित्रीकरण याआधारे दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत १०४ दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी ९२ जणांना अटक केली आहे. तर १२ जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. आणखी काही  जणांना पोलिस अटक करणार आहेत. जो व्यक्ती दंगल करताना किंवा दंगलखोरांना मदत करताना दिसतो, अशा प्रत्येकावर पोलिस कारवाई करणार आहेत. समाज माध्यमांवर ज्यांनी दंगल भडकावण्यासाठी चिथावणी दिली, त्यांनाही सहआरोपी केले जाणार आहे. आतापर्यंत एकूण ६८ पोस्ट डिलिट करुन कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी दगल भडकवणारे पॉडकास्ट केले, अफवा पसरवल्या, अशा सर्व जणावर कारवाई होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

नुकसान भरपाई मिळणार: फडणवीस

हिंसाचारात ज्यांचे नुकसान झाले आहे, ज्यांच्या गाड्या फुटल्या आहेत, त्यांना येत्या तीन-चार दिवसांत नुकसान भरपाई मिळेल. नागपूरमधील संचारबंदीमुळे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापारावर परिणाम झाला आहे. आता वातावरण शांत असल्याने यामध्ये संचारबंदी शिथिल करण्याचा प्रयत्न केला जाणार अहे. मात्र, पोलिस पूर्णपणे जागृत राहतील. दंगलीत झालेले नुकसानीचे पैसे दंगलखोरांकडू वसूल केले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दंगलीचे मालेगाव कनेक्शन ?

नागपूर हिंसाचाराची सूत्रे बांगलादेशातून हलवण्यात आली की नाही, हे आताच सांगता येणार नाही, असे सांगताना फडणवीस म्हणाले, मात्र, या दंगलीचे मालेगाव कनेक्शन स्पष्ट आहे. दंगलीत महिला पोलिस कर्मचार्‍यांशी अभद्र व्यवहार झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, मी पोलिस आयुक्तांकडून माहिती घेतली. त्यांनी असा कोणताही अभद्र व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. महिला पोलिसांवर दंगलखोरांनी दगडफेक केल्याचे त्यांनी सांगितले.
 

Related Articles