हिथ्रो विमानतळ आगीनंतर बंद   

हजारो उड्डाणे रद्द; लाखो प्रवाशांची गैरसोय

लंडन : ब्रिटनमधील हिथ्रो विमानतळाजवळील एका वीज उप केंद्रात आग लागली. त्यामुळे विमानतळासह सुमारे १५० घरांचा वीजपुरवठा खंंडित झाला. विमानतळावरील वीज गायब झाल्याने प्रवाशांची कुंचबणा झाली. विमानतळ दिवसभरासाठी बंद झाले होते. त्यामुळे प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते. 
 
सुमारे १ हजार ३५० विमान उड्डाणांवर परिणाम झाला. विमानांचे वेळापत्रक कोलमडल्याचे दूरगामी परिणाम अनेक दिवस राहणार आहेत. पर्यायाने अनेकांचे विमान प्रवास लांबला आहे, अशी माहिती फ्लाइट रडार २४ ने दिली. जी विमानांच्या मार्गावर लक्ष ठेवून असते.विमानतळ बंद करण्याची घोषणा केली तेव्हा १४० विमाने आकाशात होती. अनेक विमाने उतरण्याच्या प्रतीक्षेत हवेत घिरट्या घालत होती. अनेक विमाने पॅरिस, ग्लास्गो आणि न्यूयॉर्कच्या दिशेने वळवण्यात आली. 
 
दरम्यान, लंडन शहरापासून दोन मैलांवर वीज उपकेंद्र आहे. तेथील रोहित्रात आगीचा भडका उडाला. पर्यायाने वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा थेट फटका विमानतळाला बसला. आग नियंत्रणात आणणण्यासाठी सात तासांपेक्षा अधिक काळ लागला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. आगीचे नेमके कारण समजलेले नाही, असे ऊर्जा सचिव एड मिलिबंद यांनी सांगितले. वीजपुरवठा बंद झाल्यानंतर जनित्राच्या साहाय्याने विमानतळाचा वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे दिवसभरासाठी विमानतळ ंबंद करणे भाग पडले होते. आणखी काही दिवस प्रवाशांनी प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, हिथ्रो जगभरातील सर्वात गजबजलेले विमानतळ आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील उड्डाणे येथूनच होतात. जानेवारीत ते जगातील सर्वात गजबजलेले विमानतळ ठरले होते ६० लाख ३० हजार जणांनी तेव्हा प्रवास केला होता. सरासरी दिवसाला दोन लाख जण या विमानतळावरून प्रवास करत असल्याचे दिसून आले. 

Related Articles