खैबर पख्तुनख्वा प्रांतात कॅप्टनसह दहा बंडखोर ठार   

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. त्यात कॅप्टन आणि सुमारे १० दहशतवादी ठार झाले. 
डेरा इस्माइल खान जिल्ह्यात बंदी घातलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कारने मोहीम उघडली होती, अशी माहिती अंतर्गत जनसंपर्क सेवा विभागाने दिली. परिसरात दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. गोळीबारात कॅप्टन  हसनैन अख्तर ठार झाला. सुमारे दहा दहशतवादी ठार झाले असून घटनास्थळावरून शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. सामान्य नागरिक आणि सैनिकांवर हल्ले चढविणार्‍या दहशतवाद्यांना ठार केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, परिसरातील दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करणे आणि त्यांना नेस्तनाबूत करण्याची मोहीम लष्कराने आखली आहे. त्याअंतर्गत कारवाई केली आहे. कॅप्टनच्या मृत्यूनंतर ती आक्रमकपणे राबविली जाणार आहे. 
 
दरम्यान, २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर खैबर पख्तुनख्वा आणि बलूतचिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण ४२ टक्के वाढल्याचे उघड झाले, असा अहवाल पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट आणि सिक्युरिटी स्टडिजने प्रसिध्द केला होता. त्यात म्हटले आहे की, ७४ दहशतवादी हल्ले झाले. देशभर ९१ जणांचा मृत्यू झाला. त्यात ३५ सुरक्षा रक्षक, २० नागरिक आणि ३६ दहशतवाद्यांचा समावेश होता. ११७ जण जखमी झाले. त्यात ५३ सुरक्षा रक्षक, ५४ नागरिक आणि दहा दहशतवाद्यांचा समावेश होता.
 
दरम्यान, बलूचिस्ताननंतर खैबर पख्तुनख्वा दहशतवाद्यांचे मोठे केेंद्र बनले आहे. खैबर पख्नुनख्वातील अनेक जिल्ह्यात दहशतवाद्यांचे प्राबल्य आहे. तेथे २७ दहशतवादी हल्ले झाले. १९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ११ सुरक्षा रक्षक, सहा नागरिक आणि दोन दहशतवादी आहेत. आदिवासींचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यात १९ दहशतवादी हल्ले झाले. १३ सुरक्षा रक्षकांसह ४६ जणांचा आणि २५ दहशतवादी ठार झाले आहेत.

Related Articles