कर्नाटक विधानसभेत गदारोळ   

भाजपचे १८ आमदार सहा महिन्यांसाठी निलंबित

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरुन शुक्रवारी जोरदार गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. यावेळी भाजपचे आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत आले आणि विधेयकाची पत्र फाडत ती अध्यक्षांच्या दिशेने फिरकावली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर यांनी मार्शलमार्फत भाजप आमदारांना सभागृहाबाहेर काढले. तसेच, भाजपच्या १८ आमदारांना सहा महिन्यांसाठी निलंबित केले. या आमदारांमध्ये डोड्डनगौडा पाटील, अश्वथ नारायण आणि मुनिरत्न यांचा समावेश आहे.कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले. भाजपने हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे सांगत त्याला कायदेशीररीत्या आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. 
 
काँग्रेसने कर्नाटकात कंत्राटी जिहाद सुरू केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेस अल्पसंख्याक समुदायाला १०० टक्के आरक्षण देऊ शकते, असा दावा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. दरम्यान, कर्नाटक विधानसभेत हनी ट्रॅपच्या मुद्यांवरून गदारोळ झाला. एका वरिष्ठ मंत्र्यांसह ४८ जणांशी संबंधित हनीट्रॅप प्रकरणाच्या आरोपांवरून विरोधकांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, हनीट्रॅप प्रकरणी कोणालाही संरक्षण दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. 
 
या गदारोळातच सरकारने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला. शंभर टक्के वेतनवाढीसंदर्भातील विधेयक कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी मांडले. आता मुख्यमंत्र्यांचे वेतन ७० हजारांवरुन दीड लाखांवर पोहोचले. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचे वेतन ७५ हजारांवरुन सव्वा लाख दरमहा झाले.

Related Articles