सौरभ भारद्वाज दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष   

‘आप’मध्ये संघटनात्मक बदल

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागणार्‍या आम आदमी पक्षाने संघटनात्मक फेरबदल केले आहेत. माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांची दिल्लीच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियक्ती करण्यात आली आहे. तर, ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.भारद्वाज हे सौरभ राय यांची जागा घेणार आहेत. राय यांना गुजरातचे प्रभारी करण्यात आले आहे.
 
‘आप’चे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. खासदार राघव चढ्ढा आणि संजय सिंह हेही बैठकीस उपस्थित होते. ‘आप’चे सरचिटणीस (संघटन) संदीप पाठक यांनी याबाबत माहिती दिली.गुजरात मोदी आणि शहा यांचे गृहराज्य आहे. भाजपला शह देण्यासाठी ‘आप’ने गुजरातमध्ये पक्ष मजबुतीचा निर्णय घेतला आहे. याची जबाबदारी राय यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
 
राज्यसभा खासदार पाठक यांना छत्तीसगढचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंकज गुप्ता हे गोव्याचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा मेहराज मलिक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.‘आप’ला दिल्ली गमवावी लागली.  आता पंजाब टिकवण्याचे पक्षासमोर आव्हान आहे. कारण, सध्या ‘आप’ची एकमेव पंजाबमध्ये सत्ता आहे. भगवंत मान हे पंजाबची धुरा सांभाळत आहेत. सिसोदिया यांनी दिल्लीत उप मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. याशिवाय, त्यांच्याकडे अनेक खात्यांचा कार्यभार होता. ते पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे सिसोदिया यांना पंजाबचे प्रभारी म्हणून पक्षाने नियुक्त केले आहे. तर, सत्येंद्र जैन यांना सह-प्रभारी बनवण्यात आले आहे.
 
भारद्वाज यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले. ग्रेटर कैलाश मतदारसंघातून भाजपच्या शिखा राय यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान, दिल्लीतील पराभवानंतर आतिशी यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 

Related Articles