भूमाफियांकडून ६४ हजार एकर बेकायदा जमीन हस्तगत : आदित्यनाथ   

लखनौ : उत्तर प्रदेशात २०१७ पासून रेंगाळलेली ३३ लाख महसुली प्रकरणे निकाली काढून भूमाफियांनी बळकावलेली ६४ हजार एकर बेकायदा जमीन हस्तगत करून मूळ मालकांना ती देण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी ही माहिती दिली. 
 
मिहीपूरवा येथे नवीन तहसील इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना योगी यांनी जमिनीशी संबंधित बाबींमध्ये न्याय आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशात ३३ लाखांहून अधिक महसुली वाद होते, ज्यात जमीन फेरफार, सीमांकन आणि वापर हक्कांच्या प्रकरणांचा समावेश होता. अशा रेंगाळलेल्या  प्रकरणांमुळे वारंवार वाद, हिंसाचार आणि बेकायदा जमीन हडप होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले होते. आधीच्या सरकारांनी गैरव्यवहार आणि बेईमानी वाढू दिली, त्यामुळे गरिबांना न्यायाची आशा उरली नाही. मात्र, उपविभागीय अधिकार्‍यांपासून सर्व प्रशासकीय स्तरावरील प्रकरणे निकाली काढण्यासाठी आम्ही कालमर्यादा निश्चित केल्या. भूमाफियाविरोधी टास्क फोर्सच्या माध्यमातून भूमाफियांविरोधात सरकारने केलेल्या कारवाईमुळे ६४ हजार एकर बेकायदा ताब्यात घेतलेली जमीन जप्त करण्यात आली. संबंधित मूळ मालकांना ही जमीन ताब्यात देण्यात येत आहे.

Related Articles