निवडणुकीतील आश्वासनावरून फडणवीस आणि पटोले यांच्यात खडाजंगी   

मुंबई,(प्रतिनिधी) : मागील वर्षी  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील युवकांना सरकारी सेवेत सामावून घेता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. निवडणुकीपूर्वी तसे आश्वासन दिले होते की नाही, यावरून  विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यात आव्हान-प्रतिआव्हानाचा सामना रंगला.
 
प्रशिक्षण आधी सहा महिन्यांचे होते. नंतर, ते ११ महिने करण्यात आले. या बेरोजगार तरुणांना अनुभव मिळावा म्हणून ही योजना आणली होती. त्यामुळे या उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याची मागणी न्यायालयात सुद्धा टिकणार नाही. त्यांची मागणी मान्य केली तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला काही अर्थ राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट केले.
 
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या मुद्द्यावरून काल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यात जोरदार चकमक उडाली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत ज्या बेरोजगार तरुणांना राज्य सरकारच्या  विविध विभागात घेण्यात आले आहे, त्यांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन निवडणुकीत महायुती सरकारच्या वतीने देण्यात आले होते, असा दावा पटोले यांनी केला. हा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळून लावला.
 
काल विधानसभेत विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आले. तत्पूर्वी, या विधेयकावरील चर्चेच्या निमित्ताने पटोले यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा मुद्दा मांडला. या योजनेत निवड झालेल्या तरुणांना शासकीय सेवेत कायम करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते. या आश्वासनाची चित्रफीत आपल्याकडे असल्याचे पटोले म्हणाले. त्यावर  फडणवीस यांनी आपण असे आश्वासन दिलेच  नव्हते, असे स्पष्ट केले. या योजनेच्या अंतर्गत ११ महिन्यांवर प्रशिक्षण देता येणार नाही ही भूमिका मी पहिल्या दिवसापासून मांडली आहे. कारण, हे प्रशिक्षण आहे.  प्रशिक्षणात ११ महिन्यांवर सेवेत ठेवता येणार नाही, असे फडणवीस यांनी  स्पष्ट केले. मी तसे बोललो असेल तर मला माझी चित्रफीत दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी पटोले यांना दिले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माझी चित्रफीत दाखवाच, होऊन जाऊद्या ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’, असे आव्हान पटोले यांना दिले. हे आव्हान आपण स्वीकारले असे सांगत सोमवारी फडणवीस, शिंदे आणि लोढा यांच्या भाषणाची चित्रफीत आपण सभागृहात दाखवतो, असे सांगत पटोले यांनी फडणवीस यांचे  आव्हान स्वीकारले. या बेरोजगारांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. राज्य  सरकारने दिलेल्या आश्वासनांची माझी चित्रफीत त्यांनी मला दाखवली आहे, असे पटोले म्हणाले. 

Related Articles