रसिकांमुळे गायकांची जबाबदारी अधिक वाढते   

शेखर सेन यांची भावना 

पं. जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने गौरव

पुणे : बाराखडीमध्ये वर्ण आणि अक्षरे असतात. अक्षरे कधी नष्ठ होत नाहीत. जेव्हा तुम्ही काही गाता तेव्हा रसिक प्रेक्षक ते कधीच विसरत नाहीत. इथेच कलाकाराची जबाबदारी वाढते. त्यामुळे आम्हाला बोलण्याआधी दहा वेळा तर गाण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागतो, असे मत संगीत नाटक अकादमीचे माजी अध्यक्ष शेखर सेन यांनी व्यक्त केले. 
 
आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १९ व्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवामध्ये यावर्षी शेखर सेन यांचा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पं. जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच राजेश गोडबोले यांचाही सन्मान करण्यात आला. पं. शौनक अभिषेकी, उज्ज्वल केसकर, प्रवीण बढेकर, पं. हेमंत पेंडसे, सुमेधा वझे, डॉ. संदीप पुटाला, विद्येश रामदासी, अंकुश भगत आणि महेश पानसे आदी उपस्थित होते. 
 
सेन म्हणाले, आम्ही कलाकार भाग्यवान आहोत कारण संगीत, नृत्य, नाटक या क्षेत्रात काम करत असताना कलाकार आणि समोरचा प्रेक्षक असे आम्ही दोघेही सुखी असतो, आनंदी असतो. यापेक्षा मोठा आनंद नाही असे मला वाटते. त्यातही मी जेव्हा संत, महात्मांचा अभिनय करतो तेव्हा त्यांचे व्यक्तीमत्त्व मला २ एक तास परकाया प्रवेश करून जगता येते ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असल्याचेही सेन यांनी नमूद केले. प्रकाश जावडेकर म्हणाले, संगीतात ताकद आहे. संगीत माणसाला दु:खाच्या प्रसंगी सकारात्मक उर्जा देते. भारतीय संगीत ही आपल्याला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. पं. शौनक अभिषेकी, डॉ.सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘हे बंध रेशमाचे’ हा सांगीतिक कार्यक्रम पार पडला. 
 

Related Articles