ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट करणार   

पीएमपी प्रशासनाचा निर्णय

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार भेकराईनगर ई-डेपोमधून सीएनजी बस सुरू करण्यात आल्या आहेत. अनेकदा चार्जिंगची समस्या निर्माण होते. त्यामुळे, ई-डेपोमधून सीएमजी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
पीएमपीचे पुणे स्टेशन, भेकराईनगर, वाघोली, बाणेर आणि निगडी असे एकूण पाच ई-डेपो पीएमपी आहेत. या डेपोमधून सध्या ४९० ई-बसचे संचलन चालते. पण, काही ई-बस जुन्या झाल्या आहेत. तसेच, चार्जिंगची समस्या निर्माण झाल्यामुळे दुपारच्या टप्प्यात ई-बस फेर्‍यांना उशीर होतो. तर, काही फेर्‍यादेखील अचानक रद्द होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे पीएमपीच्या अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी ई-डेपोतील सेवा व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी तिथे २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट करून त्या ठिकाणाहून चालविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
 
पीएमपीकडून पहिल्या टप्प्यात भेकराईनगर येथील ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट केल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या सीएनजी बसचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर बाणेर, निगडी डेपोमध्येदेखील लवकरच २५ टक्के सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर ई-डेपोमध्ये सीएनजी बस सुरू केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे ई-बस बंद पडल्यास प्रवाशांना अडचण येणार नाही.

दोन नवीन ई-डेपो

पीएमपीएमएलचे हिंजवडी फेज-२ आणि चर्‍होली हे दोन्ही इलेक्ट्रिक डेपो चार्जिंग पॉईंटसह बांधून तयार आहेत. लवकरच हे दोन्ही डेपो सुरू होणार असून, त्याचे उद्घाटनासाठी पीएमपीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पीएमपीच्या इलेक्ट्रिक डेपोची संख्या आता सात होणार असल्याची माहिती पीएमपीचे मुख्य वाहतुक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.
 

Related Articles