पुणे विभागातून धावणार उन्हाळी विशेष गाड्या   

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे विविध मार्गावर धावणार्‍या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. ही गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 
 
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एसी स्पेशलच्या २४ फेर्‍या होणार आहेत. वातानुकूलीत  साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी ८ एप्रिल ते २४ जून दरम्यान पुण्याहून दुपारी ३.५० वाजता दर मंगळवारी सुटेल आणि नागपूरला दुसर्‍या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. हीच गाडी नागपूरहून दर बुधवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीला २२ डबे असणार आहेत. 
 
या गाडीला उरुळी, दौंड चोर मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे. 
 
दौंड-कलबुर्गी अनारक्षित स्पेशल आठवड्यातून ५ दिवस धावणार आहे. या गाडीच्या ५ एप्रिल ते २ जुलै दरम्यान १२८ फेर्‍या होणार आहेत. ही गाडी दौंड येथून  पहाटे ५ वाजता सुटेल. त्याच दिवशी सकाळी ११.२० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. ही गाडी कलबुर्गी येथून दुपारी ४.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता दौंडला पोहोचेल. या गाडीला १२ डबे असणार आहेत. भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रस्ता, बोरोटी, दुधनी आणि गणागापूर या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. 
 

Related Articles