मसाल्यांचे पदार्थ स्वस्त; मिरची, धने, जिर्‍याच्या दरात घट   

पुणे : उन्हाळा आणि घरगुती मसाला हे समीकरणच आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु झाला की, गृहिणींना मसाला तयार करण्याचे वेध लागत असतात. त्यामुळे अनेक घरातील महिला उन्हाळ्यात वर्षभराचा मसाला तयार करुन ठेवत असतात. यंदा मसाला तयार करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी मसाल्यांच्या पदार्थांच्या दरात मोठी घट झाली आहे. 
 
मसाला तयार करण्यासाठी लागणार्‍या लाल मिरच्या, धने आणि जिर्‍यांचे दर घटले आहेत. गरम मसाल्यासाठी आवश्यक पदार्थांचे दर आवाक्यात असल्यामुळे मसाल्यांचे पदार्थ खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या वाढली आहे. लाल मिरच्या, धने, जिरे, खोबरे आदी पदार्थांना मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिलच्या १० ते १५ तारखेपासून मसाल्यांच्या पदार्थांना आणखी मागणी वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी अजित बोरा यांनी व्यक्त केला. 
 
उत्पादनात घट झाल्याने मागील वर्षी जिरे, धने इतर गरम मसाल्यांच्या पदार्थांचे दर वाढले होते. मात्र सध्या लाल मिरचीसह धने, जिर्‍याचे दर घटले आहेत. पूर्वी ३५० ते ४०० रुपये किलो असलेले जिरे सध्या २५० ते ३०० रुपये किलो झाले आहेत. यामुळे किलो मागे ७५ ते १०० रुपये दर कमी झाल्याने ग्राहकाला दिलासा मिळत आहे. त्यामुळे गृहिणीकडून या पदार्थांना मागणी वाढली आहे. तयार मसाल्यांचे दर वाढले आहेत. मात्र बर्‍याच वेळा तयार मसाल्यात विविध पदार्थांचा किंवा हलक्या प्रतीचे पदार्थ वापरले जातात. त्यामुळे अनेक गृहिणी वर्षभराचा मसाला घरच्या घरी तयार करत असतात. 
 
दरात घट; मागणी चांगली
 
दरवर्षी उन्हाळ्यात महिला वर्षभराचा मसाला तयार करत असतात. यंदा लाल मिरच्यांच्या दरात घट झाली आहे. तसेच गरम मसाल्याचे भाव ही कमी झाले आहेत. जिर्‍यांच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत किलो मागे ७५ ते १०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे यंदा मसाल्यांच्या पदार्थांना मागणी चांगली आहे.
 
 - अजित बोरा, मसाल्याच्या पदार्थांचे व्यापारी.
 

घाऊक बाजारातील दर 

 
वस्तू                    सध्याचे दर
लाल मिरची        २२० ते ३५० रुपये
धने                   १०० ते २५० रुपये
बडीशेप             १३० ते ३५० रुपये
जिरे                  २७० ते ३०० रुपये
लवंग                 ८०० ते ९०० रुपये
काळीमिरी           ८०० रुपये
दालचिनी             ३०० रुपये 
 

Related Articles