हसन नवाजच्या शतकामुळे पाकिस्तानचा विजय   

ऑकलंड : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसर्‍या सामन्यात पाकिस्तानी संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या संघाने दिलेले २०५ धावांचे आव्हान पाकिस्तानने  हसन नवाजने ठोकलेल्या तुफानी शतकाच्या जोरावर अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह पाकिस्ताने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पिछाडी १-२ अशी कमी केली आहे. या मालिकेतील पुढील सामना २३ मार्च रोजी माऊंड माऊंगानुई येथे खेळवला जाणार आहे. शतकवीर हसन नवाज हा पाकिस्तानच्या आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला.  
 
मागच्या काही काळापासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटला आजच्या सामन्यामधून हसन नवाज याच्या रूपात एक नवा स्टार सापडला. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हसन नवाज याने पाकिस्तानच्या संघाला तुफानी सुरुवात करून दिली. टी-२० कारकिर्दीतील आपला केवळ तिसरा सामना खेळत असलेल्या नवाजने अवघ्या ४५ चेंडून १० चौकार आणि ७ षटकारांसह नाबाग १०५ दावा कुटून काढत पाकिस्तानला अवघ्या सोळाव्या षटकातच विजय मिळवून दिला.
 
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना महमद हारिस (४१) आणि हसन नवाज यांनी पाकिस्तानला ७४ धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार सलमान आगा (नाबाद ५१) आणि हसन नवाज यांनी दुसर्‍या विकेटसाठी अभेद्य १३३ धावांची भागीदारी करत पाकिस्तानला आरामात विजय मिळवून दिला. या दरम्यान नवाजने केवळ ४४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याबरोबरच नवाज याने टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याने २०२१ मध्ये बाबर आझम याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४९ चेंडूत ठोकलेल्या शतकाचा विक्रम मोडीत काढला. 
 
तत्पूर्वी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर न्यूझीलंडच्या संघाने आक्रमक खेळ केला. मात्र त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. दरम्यान, मार्क चॅपमन याने केलेल्या ९४ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने १९.५ षटकांत सर्वबाद २०४ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून हारिस रौफ याने सर्वाधिक ३ बळी टिपले.  
 

Related Articles