क्रांतिकारक तत्त्वज्ञ कार्यकर्ते-महात्मा बसवेश्वर   

डॉ. दीपक बोरगावे

महात्मा बसवेश्वर तथा बसवाण्णा (११०५-११६७) यांचे पूर्ण नाव बसवराज माधीराज मंडिगे. ते ब्राह्मण होते. राजा बिज्जळ (दुसरा, ११३०-११६७) यांच्या राज्यात ते मंत्री म्हणून काम करत होते. या काळात हा प्रदेश दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात पसरलेला होता. बसवाण्णांनी जातीअंताचा प्रयोग याच भूमीमध्ये केला. भारतातील कदाचित जाती-अंताचा हा प्रारंभ बिंदू असावा. बाराव्या शतकातील बसवाण्णा हेच जाती-अंताचे आद्य क्रांतिकारक होते. प्रत्यक्ष काम करणारे ते क्रांतिकारक तत्त्वज्ञ, संघटक आणि तत्कालीन समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणणारे कार्यकर्ते होते.
 
लिंगायत समाज प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात पसरलेला आहे. काही अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रात जवळपास एक कोटी लिंगायत समाज आहे. दक्षिण महाराष्ट्राचा बराचसा भाग हा बसवाण्णांच्या कालखंडात बिज्जळ राजाच्या अधिपत्याखाली होता. आता या समाजाचे सांस्कृतिकदृष्ट्या संपूर्णतः मराठीकरण झाले आहे. महाराष्ट्रातील या लिंगायत कुटुंबांच्या घरात गेल्यानंतर बसवाण्णांचा किंवा शंकराचा एक फोटो दिसतो. शिवलीलामृत नावाचा धार्मिक ग्रंथ कुठेतरी शोभनीय अशा ठिकाणी ठेवलेला असतो. कन्नड भाषा ही संपूर्णतः हरवली असल्यामुळे, हा समाज एका संस्कृतीला आणि भाषेला मुकलेला आहे.
 
बसवाण्णांनी समतेचे चिन्ह म्हणून इष्टलिंगाचा वापर केला. अनेक समाजातील अठरापगड जातीचे लोक अनुभव मंटपात येत असत. यात महिलांचाही सहभाग होता. सर्व जातीच्या लोकांना इष्टलिंगामुळे ‘आपण सर्वजण एक आहोत’ ही समतेची भावना निर्माण होत असे. त्या काळातील लोकांना एकत्र आणण्याच्या, संघटित करण्याच्या प्रयत्नाचा हा भाग होता. समाजवादी रचना निर्माण करण्याचा बसवाण्णांचा हा प्रयोग होता. यात बसवाण्णा यशस्वीही झाले. 
 
लिंगायत धर्म हा हिंदू धर्मापेक्षा स्वतंत्र धर्म आहे. त्याला तशी मान्यता मिळावी अशा प्रकारच्या चळवळी झाल्या, त्यासाठी मोर्चे निघाले आहेत. आपल्या कालखंडात बसवाण्णांनी जातिअंताचा प्रयोग केला. हिंदू धर्म हा कर्मकांड सांगणारा धर्म आहे. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा आहे. पोथ्या आणि पुराणे यातून भेदाच्या भिंती उभारणार्‍या या धर्माला महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राणपणाने विरोध केला.
 
बसवण्णांनी जाती-अंत, स्त्री-शिक्षण, अनुभव मंटप (भारतीय इतिहासातील ’पहिली लोकशाही संसद’ ही बहुतेक बसवाण्णांनीच सुरू केली) हा समतेची परंपरा सांगणारा क्रांतिकारक प्रयोग, आणि तोही बाराव्या शतकात केला. देव, पुराण, पुनर्जन्म, कर्मकांड, जात, लिंगभेद, अनिष्ट रूढी आणि परंपराचा त्यांनी विरोध केला. श्रम आणि कष्टाला केंद्रस्थान दिले. त्यांच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी माणूस होता. बाराव्या शतकातला हा कार्ल मार्क्सच म्हणावा लागेल. ते त्यांच्या काळाच्या पुढे होते. ते कवी आणि वचनकार होते :
देवांवर वार करेन
शास्त्राला बेड्या ठोकेन
तर्काच्या पाठीवर आसूड ओढेन
आगमाचे नाक कापेन
मी मातंग चन्नय्याच्या घरचा पुत्र आहे
पाहा देवा
महाज्ञानी कुडलसंगमदेवा
 
अनुभव मंटपात पुरुषांबरोबर स्त्रियांचाही सहभाग होता. बिज्जळ राज्यात प्रधानमंत्री म्हणून काम करत असताना एका पैशाचाही भ्रष्टाचार त्यांनी होऊ दिला नाही. राजा बिज्जळ यांनाही काही करू दिले नाही. त्यांचा हा नैतिक दबाव त्यांच्या कार्यकाळात राहिला.स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य देणार्‍या आणि जातीची चौकट मोडून टाकणार्‍या या क्रांतिकारकाचा आज अन्वय काय आहे पाहा? खुद लिंगायत समाजामध्ये इतक्या जाती आहेत की, ओबीसीचे फायदे मिळावे म्हणून अनेक चळवळी झाल्या. यात मागासलेल्या व्यक्तीला या आरक्षणाचा फायदा मिळायला हवा; पण तसे होत नाही. पण याचा फायदा दुसरेच घेत आहेत. जातीमध्ये अनेक उपजाती आहेत. ज्याने आपले आयुष्य जाती-अंतासाठी घालवले, त्यांचे अनुयायी जातिभेदात अडकलेले आहेत.

क्रांतिकारी घटना

बसवाण्णांना दलित, श्रमिक, कष्टकरी, कुटीरोद्योग कलाकुसर, परंपरागत कौशल्याची कामे करणार्‍या कामगारांबद्दल आदर होता. या समाजाशी ते एकरूप झाले होते. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. बिज्जळ राज्यात चर्मकाराच्या मुलाशी ब्राह्मण मुलीचा विवाह लावण्याचे कृत्य त्यांनी केले. याला संसदेची (अनुभव मंटप) मंजुरी होती. बसवाण्णांच्या कारकीर्दीतला हा क्रांतिकारक निर्णय ठरला. तत्कालीन काळातील एक लाख शहाण्णव हजार अनुयायी (शरण) या विवाहाला हजर होते, हा आकडा महत्त्वाचा आहे. या निमित्ताने तत्कालीन समाजात किती घुसळण झाली होती? हे समजून येते. हरळय्या हा चर्मकार होता. यांच्या मुलाचे नाव शीलवंत होते. ही ब्राह्मण मुलगी मधुवरस यांची कन्या होती. हिचे नाव लावण्यवती होते. अनुभव मंटपात दोघांच्या संमतीने हा निर्णय घेतला होता. याची परिणीती एका क्रांतिकारक घटनेत झाली.
 
तत्कालीन सनातन्यांना हा विवाह मान्य नव्हता. खुद राजा बिज्जळ यांनाही हा विवाह मान्य नव्हता. या घटनेमुळे हाहाकार माजला. सनातन्यांनी धर्मयुद्ध पुकारले. मुलगा आणि मुलीच्या आई-वडिलांचे डोळे काढून त्यांना हत्तीच्या पायाला बांधून भर रस्त्यात ठार मारले. याचबरोबर हजारो अनुयायांना ठार मारले. वचन भांडाराला आग लावण्यात आली. राज्यातील अराजकतेमुळे बसवाण्णांना कुडलसंगम या गावी हलवण्यात आले. याच दरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रवासात त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा होता असे म्हटले जाते; पण शत्रूनी हल्ला करून बसवाण्णांना रस्त्यातच ठार मारले गेले असा एक (अभ्यासकांचा) मतप्रवाह आहे. या परिस्थितीमध्ये राजा बिज्जळ यांचाही खून करण्यात आला. नाटककार गिरीश कर्नाड यांनी या घटनेवर तलेदण्ड हे नाटक लिहिले आहे. 
 
’अनुभव मंटप’ ही संस्था बसवाण्णांच्या कार्यकर्तृत्वामुळेच बिज्जळ राज्यात अस्तित्वात आली. मंटप ही लोकशाही पद्धतीने समाजातील समस्यांची चर्चा आणि उपाययोजना असे एक संभाषित (वळीर्लेीीीश) होते. बाराव्या शतकापर्यंत शोषण करण्यासाठी राक्षसरूप धारण केलेल्या पद्धती नाकारण्यासाठी ’अनुभव मंटप’ संस्था अस्तित्वात आली, असे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी म्हटले आहे. 
 
या मंटपात स्त्रियांना प्रवेश होता. अक्कमहादेवी ही तत्कालीन विद्रोही कवयित्री या मंटपाचा भाग होती. या मंटपात तत्कालीन समाजातील ७० स्त्रिया सहभागी होत्या. यातील ३६ स्त्रिया वचनसाहित्य लिहिणार्‍या होत्या. संक्कव्वा ही पूर्वाश्रमीची वेश्या, सफाई कामगार स्त्री सत्यक्का, अस्पृश्य काळव्वे, सूत कातणारी काळव्वा, कांडण करणारी सोमव्वे, काश्मीरची राजकुमारी बोंतादेवी, नाभिक लिंगम्मा, मोळिगे महादेवी, गोग्गव्वे, विणकर अमुगे रायम्मा, लक्कम्मा, कुंभार केतलदेवी- या अशा शोषित समाजातील स्त्रियांना इतक्या उंचीपर्यंत घेऊन जाणे ही बाब सोपी नाही. पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली म्हणून महात्मा जोतिबा फुले यांना काय काय नाही सोसावे लागले?
 
बसवाण्णांच्या या कार्यास खीळ बसवण्याचे काम सनातन्यांनी केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समतेचा प्रयोग या घटना मंटपात झाल्या. समतेचा विचार करणार्‍या पाश्चात्त्य देशातदेखील स्त्री लेखिका अठराव्या शतकात उदयाला आल्या. आपल्याकडे बुद्धकाळात थेरीगाथामध्येदेखील स्त्री लेखिका पाहायला मिळतात. हे परिवर्तन या क्रांतिकारक विचारवंतांमुळेच घडलेले आहे. 
 
पण समतेचा हा प्रवाह पुढे गेला नाही. यामागे अनेक स्रोत आणि शक्ति कार्यरत होत्या. आजही त्या आहेत. त्या ओळखून आपणाला बुद्ध, बसवाण्णा, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बरोबर घेऊन कार्य करायला हवे; पण हे करणारे अनेक कारणांमुळे एकतर दुखावलेले असावेत किंवा दुरावलेले. प्रत्येकाने आपापल्या पक्षाची स्थापना करून आपला घरोबा मांडलेला आहे. त्यांना एकत्र आणण्याची आणि पुढे जाण्यासाठी बसवाण्णांसारख्या नेत्यांची आज गरज आहे. केवळ बोलून काही होणार नाही. प्रत्यक्षात ीशलेपलळश्रळरींळेप करण्याची गरज आहे; ीशलेपलळश्रळरींळेप चा विचार हा एकमेकांना जोडणारा आहे. बसवाण्णांना हेच अपेक्षित होते. हे होईल; न होईल. पण होईल अशा आशावादी भावना मनात ठेवायला हव्यात. 
 
आज सोशल मीडियाच्या कालखंडात सार्वजनिक स्मरण हे एक दिवसाचे असते. ’काल’ काय सांगितले? हे लोक ’आज’ विसरतात. या अशा विचित्र आणि प्रभावी जगात वेगवेगळ्या धोरणांचा विचार करावा लागेल. त्या कशा अंमलात आणता येतील ते पाहावे लागेल.
 

Related Articles