‘एअरटेल’चा ‘स्पेसएक्स’शी करार   

वृत्तवेध

भारती एअरटेलने भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा आणण्यासाठी एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ सोबत करार केला आहे. तथापि, हा करार ‘स्पेसएक्स’ला भारतात ‘स्टारलिंक’ सेवा विकण्यासाठी मंजुरी मिळण्यावर अवलंबून असेल. ‘भारती एअरटेल’ने भारतातील ग्राहकांना ‘स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट’ सेवा प्रदान करण्यासाठी अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क यांची उपग्रह कंपनी ‘स्पेसएक्स’ सोबत भागीदारी केली असल्याचे अलिकडेच स्पष्ट केले आहे.
 
भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी ‘एअरटेल’ आणि ‘स्पेसएक्स’ एकत्र काम करतील. दोन्ही कंपन्या ‘स्टारलिंक’ सेवा भारतीय बाजारपेठेत आणण्याच्या आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा वापर करण्याच्या शक्यतांचा शोध घेतील. ‘एअरटेल’ आपल्या स्टोअरमध्ये ‘स्टारलिंक’ उपकरणे विकू शकते आणि व्यवसाय सेवांसाठी ‘स्टारलिंक ऑफर’ करू शकते. ग्रामीण भागातील शाळा, आरोग्य केंद्रे आणि दुर्गम भागात इंटरनेट सेवा देण्यासाठी ‘स्टारलिंक’चा वापर केला जाईल.
 
‘एअरटेल’ आणि ‘स्पेसएक्स’ ‘एअरटेल’च्या विद्यमान नेटवर्क सेवांमध्ये ‘स्टारलिंक’ कसे एकत्र काम करू शकेल, याचा विचार करत आहे. ‘एअरटेल’ आधीच ‘एल्युटसॅट वेब’ सोबत काम करत आहे. ‘स्टारलिंक’च्या सहकार्यामुळे सध्याचे नेटवर्क पोहोचू शकत नसलेल्या ठिकाणीही ‘एअरटेल’ इंटरनेट पुरवू शकणार आहे. यामुळे दुर्गम भागात राहणार्‍या लोकांना आणि व्यवसायांना ‘हायस्पीड इंटरनेट’ उपलब्ध होईल. 
 
‘एअरटेल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष गोपाल विठ्ठल म्हणाले की भारतातील ‘एअरटेल’ ग्राहकांपर्यंत ‘स्टारलिंक’ सेवा पोहोचवण्यासाठी ‘स्पेसएक्स’सोबत काम करणे हे आमच्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही भागीदारी भारतातील अतिदुर्गम भागात जागतिक दर्जाचे ‘हाय-स्पीड ब्रॉडबँड’ पोहोचवण्याची आमची वचनबद्धता दर्शवते. ‘स्टारलिंक’च्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना विश्वासार्ह आणि स्वस्त इंटरनेट सेवा प्रदान करू शकू. ‘स्पेसएक्स’चे अध्यक्ष गॅनी शॉटवेल म्हणाले की आम्ही ‘एअरटेल’ सोबत काम करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. ‘स्टारलिंक’ भारतीय लोक, व्यवसाय आणि समुदायांना जोडून क्रांतिकारक बदल घडवू शकते. ‘स्टारलिंक’द्वारे कनेक्ट झाल्यावर लोक आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी गोष्टी कशा करू शकतात, हे पाहणे 
आम्हाला आवडेल.
 

Related Articles