वाचक लिहितात   

केवढे हे क्रौर्य!

हिंजवडी येथील व्योम ग्राफीक्स या कंपनीतील कामगारांना घेऊन जाणार्‍या बसला आग लागली. त्यात चार कर्मचार्‍यांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना अपघाताने घडली असावी असाच समज त्यावेळी होता; मात्र ही आग म्हणजे अपघात नव्हे, तर घडवून आणलेला सूडाचा प्रकार होता असे पोलिस तपासातून स्पष्ट झाले. दिवाळीत कापलेला पगार आणि कर्मचार्‍यांशी झालेल्या वादातून संबंधित बसचालकानेच रसायन पेटवून बसला आग लावल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. बसचा चालक एवढा क्रूर कसा काय होऊ शकतो, की ज्यांच्याबरोबर इतके दिवस काम केले त्या आपल्या सहकार्‍यांच्याच जीवावर तो उठू शकतो? दिवाळीत कापलेल्या पगाराचा विषय तो कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलू शकला असता, त्यासाठी आपला आणि आपल्या सहकार्‍यांचा जीव धोक्यात घालण्याचे कारण नव्हते. आता या कृत्याचा कदाचित त्याला पश्चात्ताप होत असेलही; पण आपल्या सहकार्‍यांच्या मृत्यूला कारण ठरलेल्या या क्रूरकर्म्याला कठोर शिक्षा व्हायला हवी.

प्रतीक नगरकर, पुणे

बांगलादेशींना हाकला!

अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरित लोकांविरोधात कारवाई सुरू केली असून बेकायदेशीररीत्या अमेरिकेत राहणार्‍या लोकांना हाकलून लावले आहे. अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहणार्‍या काही भारतीयांना अमेरिकेने खास विमानाने भारतात पाठवून दिले आहे. अंतर्गत सुरक्षा आणि बेकायदेशीररीत्या राहणार्‍या स्थलांतरितांमुळे होणारा आर्थिक भार उचलणे शक्य नसल्याने अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. जर अमेरिका त्यांच्या देशात बेकायदेशीररीत्या राहणार्‍या नागरिकांना हाकलू शकतो, मग आपण आपल्या देशात बेकायदेशीररीत्या राहणार्‍या बांगलादेशी नागरिक, तसेच रोहिंग्यांना का हाकलू शकत नाही? आपल्या देशातही लाखो बांगलादेशी आणि रोहिंगे बेकायदेशीरीत्या वास्तव्यास आहेत. या बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांमुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतात अवैधरीत्या राहणार्‍या बांगलादेशींना पोसण्याचा आपण ठेका घेतला आहे का?

श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

प्रदूषण रोखा

वायू प्रदूषण हा मानवाच्या आरोग्याला गंभीर धोके निर्माण करतो. त्यामुळे माणसांचे आयुर्मान अंदाजे ५.२ वर्षांनी कमी होते असे संशोधनांती निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जगातील तापमान, हवेतील बदल, नद्यांतील पाणी, प्रदूषण इत्यादी बाबींचा अभ्यास करणार्‍या अनेक संस्था जगासमोर त्यांचे संशोधन अहवाल रूपात मांडून प्रसिद्ध करतात. अशाच स्वीस एअर क्वालिटी कंपनी, आयक्यूआरने प्रदूषणाचा अभ्यास करून जगातील २० प्रदूषित शहरांची यादी समोर आणली आहे. त्यांनी वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२४ मध्ये दिलेल्या माहितीनुसार भारत सर्वांत प्रदूषित असणारा देश जो सन २०२३ मध्ये जागतिक पातळीवर तिसर्‍या स्थानावर होता तो २०२४ मध्ये ५ व्या स्थानावर जाण्याच्या शक्यता वर्तविल्या आहेत. जगातील सर्वाधिक प्रदूषित १० शहरांपैकी ६ शहरे भारतात आहेत. बर्निहाट हे आसाममधील शहर सर्वांत प्रदूषित आहे त्यापाठोपाठ दिल्लीचा क्रमांक आहे. ही प्रदूषित शहरे उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यांमधील आहेत. उत्तरेकडील या राज्यांकडून त्यांच्या राज्यांतील प्रदूषण कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांत कमतरता असावी किंवा त्यांचे प्रदूषण थोपविण्याचे प्रयत्न सुरू असले तरीही स्थानिक पातळीवर लोकांकडून तेवढ्याच प्रमाणात प्रदूषण वाढण्यास तेथील लोकांच्या पारंपरिक जुनी विचारसरणी, पद्धती कारणीभूत ठरत असाव्यात. राज्यांकडे   प्रदूषणावर रोख लावण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही.

स्नेहा राज, गोरेगांव

शिल्पकार राम सुतार यांचा गौरव

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुतार हे वयाची शंभरी पार केलेले, परंतु अजूनही उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेले शिल्पकार आहेत. गेली सहा दशके जगाच्या कानाकोपर्‍यात त्यांनी शेकडो शिल्पे साकारली आहेत. मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिल्प आणि मालवण येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हेच राम सुतार साकारणार आहेत. आजवर पु.ल. देशपांडे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, रतन टाटा यांसारख्या दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यात आता राम सुतार या शिल्पकाराच्या नावाची भर पडत आहे. जगभरातील अनेक शिल्पाकृतींच्या उभारणीत योगदान देणार्‍या राम सुतार यांचा हा यथोचित गौरव आहे.         

संकेत कुलकर्णी, सांगली

बाजारात मिळणारे पनीर हे कृत्रिम पनीर.! 

राज्यातील खुल्या बाजारात विकले जात असलेले पनीर आणि चीज दुधापासून बनविले जात नसून शरीरास अपाय करणार्‍या वस्तूंपासून बनविले जाते असे विधानसभेत दिल्या गेलेल्या माहितीवरून समोर आले आहे. बाजारात विकले जाणारे नालॉग चीज हा पदार्थ नालॉग पनीर, फेक पनीर, आर्टिफिशियल पनीर या नावाने विकला जातो. नालॉग चीज बनविण्यासाठी दुधाच्या वापराऐवजी पाम तेल, व्हेजिटेबल फॅट्स आणि मानवी शरीराला अपाय होणार्‍या पदार्थांचा वापर केला जातो. 
 
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पनीरपैकी ७५ टक्क्यांहून अधिक पनीर हे कृत्रिम पनीर असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ कॅन्सर आणि मधुमेह यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरत असते. विधानसभेत यासंबंधी प्रश्न उपस्थित केला असता भेसळ ओळखण्यासाठी नमुने घेण्यात येतात, त्यांची प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाते, त्यात आढळलेल्या नमुन्यांवर कारवाई करत भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीवर बंधने घालण्यात येतात. अशी साठवणीतील उत्तरे दिली गेली. त्यापुढे जाऊन अस्तित्वातील नियम अधिक कठोर करण्यात येतील, केंद्र सरकारच्या नियमांत सुधारणा करण्यासाठी संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल अशी जोड माहिती देण्यात आली. वास्तविक व्हेजिटेबल फॅट्स आणि वनस्पती तुपाचा वापर करून पनीर विकण्याची परवानगी सरकार देते. पण त्यात भेसळ करून ग्राहकांना विक्री करण्यात येते तेव्हा लोकांच्या आरोग्याची काळजी सरकार घेत नाही हेच समोर येते. अन्नपदार्थांत भेसळ, पदार्थांचा दर्जा न राखणे यांवर तपास करून योग्य ती कारवाई करण्यासाठीच अन्न आणि औषध प्रशासन विभागाची नेमणूक केलेली असते, वास्तविक त्यांच्या नियमित तपासण्या, धाडसत्र आणि इतर रोखठोक कारवायांमधून दुकानदार, विक्रेते, एजंट्स यांच्यावर वचक ठेवला जाईल अशा लोकांच्या अपेक्षा असतात. परंतु राज्यभर भेसळयुक्त पनीर विकले जात आहे त्याचप्रमाणे आणखी किती खाद्यपदार्थ भेसळ करून विकले जात असावेत याचा विचार करणे कठीण आहे. सरकारच्या एखाद्या खात्याच्या निष्क्रियतेमुळे किती लोकांना भेसळ किंवा दुय्यम दर्जांच्या बनावट वस्तूंची नाईलाजास्तव खरेदी करणे पडत असते त्याची जबाबदारी कुणाची असते हे प्रश्न निर्माण होतात. खात्यांच्या मंत्रीमहोदयांनी नेहमीच सतर्क राहून आपल्या खात्यांच्या अधिकार्‍यांशी भेटीगाठी घेत राहिल्यास सर्व निष्क्रिय यंत्रणा त्यांच्या धाकाने व जागरूकतेने नेमलेल्या कामांत व्यस्त राहतील असे वाटते.

राजन पांजरी, जोगेश्वरी.

 

Related Articles