व्हॉट्सऍप कट्टा   

एक सरदार लढाईच्या वेळी आपल्या घोड्याच्या खाण्यापिण्याविषयी फार काळजी घेत असे. पुढे काही दिवसांनी लढाई संपली व त्या सरदाराचा पगार कमी झाला, त्यामुळे तो आपल्या घोड्याला अगदी निष्काळजीपणे वागवू लागला. ज्या घोड्याने पूर्वी त्याला भर लढाईच्या जागी मोठ्या शौर्याने आपल्या पाठीवर नेले होते त्याच घोड्याला तो आता मोठमोठी लाकडे वाहून नेण्याच्या कामाला लावू लागला. शिवाय त्याची काळजी घेईनासा झाला. त्यामुळे घोडा अशक्त होत चालला. पुनः एकदा लढाई सुरू झाल्याची बातमी आली असता सरदाराला लढाईवर जाण्याचा हुकूम आला. सरदार घोड्याची काळजी घेऊ लागला, तो शक्तीशाली व्हावा म्हणून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवली, पण घोड्याला त्याचे ओझे उचलण्याची ताकद नसल्याने तो वरचेवर अडखळू लागला. मग तो घोडा सरदाराला म्हणाला, ’तू आपल्या निष्काळजीपणाने ही स्थिती प्राप्त करून घेतलीस. माझ्या पाठीवर लाकडं लादून नि माझं खाणं तोडून तू मला घोड्याचा गाढव बनवलंस. अशा स्थितीत लढाईच्या कामी मी जर पूर्वीसारखा तुझ्या उपयोगी पडेनासा झालो तर त्यात माझ्याकडे दोष नाही.’
तात्पर्य : एखाद्या प्राण्याची जरुरी नसली म्हणजे त्याला पायाखाली तुडवायचे व जरुरीच्या वेळी मात्र त्याची फार काळजी घ्यायची हे हितकारक नाही.
--
यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही, तर त्यांना खरे करून दाखवणे म्हणजे यश मिळवणे होय. स्वप्ने पाहणे ही पहिली पायरी असते, पण कृतीशिवाय ती अपूर्ण राहतात. कठोर परिश्रम, सातत्य, योग्य दिशा आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, धीरूभाई अंबानी, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींनी आपल्या स्वप्नांना मेहनतीने पूर्ण केले. अडथळे येणारच, पण प्रयत्न सुरू ठेवल्यास यश नक्की मिळते. त्यामुळे यश म्हणजे फक्त स्वप्न नव्हे, तर त्यांना सत्यात उतरवण्यासाठी घेतलेली मेहनत असते.
---
दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते....
समोरून एक ससा जोरात पळून गेला.... 
पहिला वाघ (दचकून): काय गेलं रे....?
दुसरा वाघ : काही नाही रे, फास्ट फूड होतं...
--
अंतर
 
पुणे आकाशवाणी केंद्राचा ‘गृहिणी’ विभाग, ज्योत्स्नाताई देवधर सांभाळत होत्या. मी सहज म्हणून एक श्रृतिका लिहून पाठवली. ‘भेटायला ये’ त्यांचं उत्तर. अर्थात पत्राद्वारेच. जरा बिचकतच त्यांच्यासमोर उभी राहिले.
बस.
...
चांगलं लिहिलंयस , ‘अंतर’!  परदेशात गेलेला मुलगा न् आईमधलं ’अंतर’ तुला दिसलं. पण या शब्दाला केवढ्यातरी छटा आहेत.
अं? हंऽऽ
तू स्वतः यातलं मावशीचं पात्र वाचशील ना?
वाचीन की!
रेकॉर्डिंगची तारीख कळवते. त्याचवेळी प्रसारणाचीही कळेल तुला.
चालेल.
मी हसले. खुर्चीतून उठले. त्यांचा गोरापान, हसरा आणि आश्वासक चेहरा मनात ठसला. त्यानंतर रेडिओवर अनेक कार्यक्रम झाले. सा. प्रे. भगिनी मंडळातही माझ्यावर त्यांचा कायम लोभ होता. आज ‘अंतर’ हा विषय पुन्हा समेवर आला आणि ज्योत्स्नाताईंची तीव्रतेने आठवण झाली. काही माणसं भरभरून ’स्नेह’ देण्यासाठीच जीवनात येतात, असं वाटतं. असो. 
इथे ‘अंतर’ इंच, फूट किंवा कि.मीटरमधलं नसतं. गरुडाने साप पकडण्यासाठी झेपावणं किंवा बगळ्याने माशासाठी डुबकी मारण्याचंही नसतं. 
जवळिकीच असतं
विश्वासाचं असतं.   
आपलेपणाचं असतं
मनामनातलं असतं. माणसांच्या अंतःकरणातलं असतं. 
जान्हवी न् मी शाळेतल्या मैत्रिणी. आवळे-चिंचा वर्गात खाल्ल्याबद्दल शिक्षा मिळालेल्या. गळ्यात गळे घालणार्या. आता वेगळ्या शहरात राहतो. फोन होतात. गप्पा होतात. ‘आवाज’ भिडतो. जिव्हाळा कायम असल्यामुळे भेटलो की मध्ये न भेटलेलं अंतर सपकन् कापलं जातं.
‘स्पर्शाचंही’ सोपं तंत्र आहे. दोन व्यक्तींमधलं अंतर स्पर्शाने झटकन संपून जातं. आपुलकीची गोधडी पांघरली जाते. मात्र स्पर्शाच्या बाबतीत अंदाज अचूक असायला हवा नाहीतर... गडबड. 
नेत्र किंवा ‘दृष्टी’ संवेदनेतून ‘अंतर’ जोखणं थोडं अवघडच असतं. तरीपण विभाला हक्काने सांगते, ते व्हॉट्सअ‍ॅप न् फोन असले तरी एकदा भेटूया. तुला समक्ष पाहिलं की माझे डोळे निवतील.
नेहमी वाटतं, दोन व्यक्तींमधलं ‘अंतर’ अचूक, नेमकं ओळखता येणं अवघड असतं. मग सुरू होते कुरबुर...
वास्तविक तात्यांनी  वेळीच अमुक करायला पाहिजे होतं किंवा
शेजारणीने आमच्या घरात नाक खुपसायला
नको होतं. पण हे थोडंच तुमच्या मतावर अवलंबून असतं?  असं होतं नाही. सारंकाही जुळून येत नसतं. तसं जमलं तर ‘अपेक्षाभंग’ कुणाच्याच वाट्याला येणार नाही. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला,स्वतः च्या परिप्रेक्षातून व्यक्ती-व्यक्तींमधलं अंतर उमगू दे, एवढीच अपेक्षा करते. हसू नका ना!. मनापासून वाटतं तेच......
 
- कविता मेहेंदळे
मो. ९३२६६ ५७०२७
 

Related Articles