’वैशाली’च्या मालकाच्या जावयास अटक   

 

कर्ज गैरव्यवहार प्रकरण
 
पुणे : पत्नीच्या नावे असलेली सदनिका तिच्या संमतीशिवाय गहाण ठेवून त्याद्वारे पाच कोटींचे कर्ज काढल्याप्रकरणी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील हॉटेल वैशालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांच्या जावयाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. विश्वजीत विनायकराव जाधव (वय ४१, आरंभ अपार्टमेंट, घोले रस्ता, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, त्याची पत्नी निकीता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली. हा प्रकार ७ डिसेंबर २०२२ ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला.
 
विश्वजीत जाधव याने आर आर फायनान्सचे रवी परदेशी आणि कोटक महिंद्रा बँक येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश चौधरी यांच्याबरोबर संगनमत केले आणि निकिता हॉस्पिटॅलिटी एलएलपीच्या कार्यालयात बैठका घेतल्या. तक्रारदार यांच्या संमतीविना कोटक महिंद्रा बँकेतून कर्ज काढण्याकरीता कर्जाचे अर्ज व इतर कागदपत्रांच्या बनावट स्वाक्षर्‍या केल्या आणि त्या खर्‍या असल्याचे भासवल्या. तसेच, बनावट शिक्क्यांचा वापर करुन त्यांच्या आधारे बनावट दस्त तयार करुन तक्रारदार यांच्या नावे असलेली सदनिका कोटक महिंद्रा बँकेकडे तारण ठेवली. त्यानंतर, बँकेकडून ५ कोटींचे कर्ज मंजूर करुन स्वत:च्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यामध्ये ४ कोटी ९३ लाख रुपये हस्तांतरित करून निकीता यांची फसवणूक केली.
 
आरोपी विश्वजीत जाधव, रवी परदेशी आणि राजेश चौधरी यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यापासून ते तिघेही फरार होते. त्या तिघांपैकी विश्वजीत जाधव याला आज दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. विश्वजीत जाधव याने बनावट कर्ज मंजूर करुन घेत, ४ कोटी ९३ लाखांचा वापर कशासाठी केला?, याबाबत आरोपीकडे पोलीस कोठडीमध्ये घेऊन सखोल चौकशी आवश्यक आहे. या गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. या कटामध्ये अन्य कोणी मदत केली आहे का? याचा तपास करायचा आहे. या गुन्ह्यात वापरलेला बनावट शिक्का हस्तगत करायचा आहे. 
 
विश्वजीत जाधव याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुक तसेच कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल आहे यावरुन आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे दिसून येत आहे. आरोपीने अशाच प्रकारे अन्य गुन्हे केले आहेत किंवा कसे? याबाबत पोलीस कोठडीमध्ये चौकशी करणे आवश्यक असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ए.बी. गायकवाड यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
 

Related Articles