रशियाच्या विमानतळावर युक्रेनकडून ड्रोन हल्ले   

कीव्ह : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील फोनवरील संभाषणानंतर अवघ्या काही तासांनी रशिया आणि युक्रेनने एकमेकांवर ऊर्जा केंद्रांवर हल्ले केल्याचे आरोप केले. युक्रेनने रशियाच्या स्ट्रैटजिक बॉम्बर तळावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे, की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रशियन प्रदेशात १३२ युक्रेनियन ड्रोन पाडले आहेत.
   
रशियातील एंगेल्समध्ये हा हल्ला करण्यात आल्याचे रशियन अधिकार्‍यांनी सांगितले आहे. हा हल्ला इतका शक्तिशाली होता, की युद्ध क्षेत्रापासून सुमारे ७०० किमी अंतरावर असलेल्या या एअरबेसमध्ये मोठा स्फोट झाला असून, येथे आग लागली. रशियाच्या सेराटोव्ह या शहराचे गव्हर्नर रोमन बुसार्गिन यांनी सांगितले, की युक्रेनने केलेल्या ड्रोनने हल्ल्यामुळे एअरफील्डमध्ये आग लागली. यामुळे आसपासच्या रहिवाशांना बाहेर काढावे लागले.
 
रशियाचे अणुबॉम्बर विमान उड्डाण करण्यास असमर्थ 
  
 या विमानतळावर टुपोलेव्ह टीयू १६० अणुबॉम्बर विमाने तैनात करण्यात आली आहेत. टीयू १६० हे रशियाचे सर्वात आधुनिक आण्विक क्षेपणास्रांचा मारा करणारे विमान आहे. या विमानाच्या मदतीने रशियाने युक्रेनमधील अनेक स्थळांना लक्ष्य केले आहे. आता या हल्ल्यामुळे विमानतळ निकामी झाला आहे, त्यामुळे टीयू १६० विमानांची उड्डाणे होऊ शकत नाहीत.
  
युक्रेनने डिसेंबर २०२२ मध्ये एंगेल्स एअर बेसवर देखील हल्ला केला होता. जानेवारीमध्ये, युक्रेनने दावा केला, की त्यांनी एंगेल्स एअर बेसवरील तेल डेपोवर हल्ला केला, या हल्ल्यामुळे येथे लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी पाच दिवस लागले होते. ट्रम्प यांनी बुधवारी (१९ मार्च) रोजी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. ३० दिवस एकमेकांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव मान्य करूनही रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचा आरोप यापूर्वी झेलेन्स्की यांनी केला होता.

Related Articles