छत्तीसगढमध्ये चकमकीत ३० नक्षलवादी ठार   

विजापूर/कांकेर : छत्तीसगढच्या बस्तर भागात सुरक्षा दलाबरोबरील दोन वेगवेगळ्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी गुरूवारी दिली.विजापूर जिल्ह्यातील कारवाईत २६ नक्षलवादी ठार झाले. तर, कांकेरमधील चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. सीमा सुरक्षा दल आणि जिल्हा राखीव दलाने (डीआरजी) ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान एक जवानही ठार झाला, असे अधिकार्‍यांनी सांगितले. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘नक्षलमुक्त भारत मोहिमे’च्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल पडले असल्याचे एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. नक्षलवाद्यांनी शरण यावे, असे आवाहन आम्ही केले आहे. 
 
छत्तीसगढमध्ये चकमकीत ३० नक्षलवादी ठार(पान १ वरुन) शरण येणार्‍या नक्षलवाद्यांना पुनर्वसनासाठी निधी दिला जात आहे. जे नक्षलवादी शरण येत आहेत, ते चांगले जीवन जगत आहेत. मात्र, जे नक्षलवादी शरण येणार नाही, त्यांच्याविरोधात मोदी सरकार कोणतीही नरमाईची भूमिका घेणार नाही. पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत देश नक्षलमुक्त होईल, असेही शहा यांनी म्हटले आहे.
 
नक्षलग्रस्त बस्तर विभागात सातत्याने नक्षलविरोधी मोहीम राबवली जात आहे. विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात काल सकाळी सातच्या सुमारास सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. त्यावेळी गंगलूर पोलिस स्टेशन परिसरात (विजापूरमधील) अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यास सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले. या सर्वांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरुन शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. या कारवाईदरम्यान जिल्हा राखीव रक्षकचा (डीआरजी) एक जवान शहीद झाला, असेही त्यांनी सांगितले. कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात सकाळी आणखी एक चकमक झाली.  जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. त्यावेळी चकमक उडाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून काही स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले. 

Related Articles