मुंबईत होणार सहा पदरी महामार्ग   

मुंबई : मुंबईत सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग होणार आहे. जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौकदरम्यान सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४५०० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. हा नवीन महामार्ग पागोटे गावाजवळील जेएनपीए बंदरापासून सुरू होईल आणि मुंबई-पुणे महामार्गावर संपेल. हा महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. हा प्रकल्प बीओटी  तत्त्वावर विकसित केला जाणार आहे. जेएनपीए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास या सर्व गोष्टी लक्षात घेता या प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून पावले उचलली जात आहेत. 
 
सध्या पळस्पे फाटा, डी-पॉईंट, कळंबोली जंक्शन, पनवेलसारख्या शहरी भागातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जेएनपीए बंदरातून निघालेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग ४८ चा मुख्य सुवर्ण चतुर्भुज टप्पा आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोहोचायला तब्बल २ ते ३ तास लागतात. २०२५ मध्ये नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार आहे. त्यावेळी थेट कनेक्टिव्हिटीची गरज आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसारच कनेक्टिव्हिटीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जेएनपीए बंदर आणि नवी मुंबई एअरपोर्ट जोडण्याची लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा प्रकल्प तयार केला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते गोव्याकडे जाणार्‍या महामार्गापर्यंतचा प्रवास वेळ अटल सेतूपासून फक्त २०-३० मिनिटांपर्यंत कमी होऊन कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

Related Articles