दिशा सालियन प्रकरणावरुन विधिमंडळात गदारोळ   

मुंबई : पाच वर्षांपूर्वीचे दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी केल्यानंतर विधिमंडळात या प्रकरणाचे गुरूवारी जोरदार पडसाद उमटले. सत्ताधारी पक्षातील काही  सदस्यांनी आदित्य ठाकरे  यांच्या अटकेची व प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याने विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. संसदीय कामकाय मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या गोंधळाबद्दल चिंता व्यक्त केली. दरम्यान, भाजप व शिंदेसेनेच्या सदस्यांनी विधानसभेत सालियन प्रकरण लावून धरले. दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असून उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांची चौकशी करून कारवाई करु, असे आश्वासन दिले.
 
सभागृहातील वाद वैयक्तिक पातळीवर येणे म्हणजे नळावरची भांडणे आहेत का? अवघा महाराष्ट्र हे पाहत आहे. सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी येत आहेत. ते काय म्हणत असतील, असे सांगत त्यांनी सभागृहाच्या कामकाजाविषयी  चिंता व्यक्त केली. सभागृहाच्या नियमित कामकाजात प्रश्नोत्तरे संपताच ‘पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’व्दारे डॉ. मनीषा कायंदे यांनी दिशा सालियन प्रकरण सभागृहाच्या निर्शनास आणले होते. 
 
खोटेनाटे आरोप कराल तर पस्तावाल : उद्धव 
 
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, खोटेनाटे आरोप करत असाल तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील, असा इशारा दिला.  तर, आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयात जो अर्ज दाखल झाला आहे त्याला न्यायालयात उत्तर देऊ. तुम्ही हवी ती चौकशी करा.

Related Articles