जेजुरी गडावर रंगपंचमी उत्साहात   

जेजुरी, (वार्ताहर) : सोन्यासारख्या पिवळ्या दिसणार्‍या भंडार्‍यामध्ये कायमस्वरूपी न्हालेल्या कुलस्वामी खंडेरायावर सप्तरंगी रंगाची उधळण करण्यात आली. 
पहाटे ब्राह्ममुहूर्तावर मंदिराचे द्वार उघडले ते सदानंदाचा येळकोटच्या गजरामध्येच, पहाटेच्या तोंडधुनीच्या महापूजेची लगबग सुरू असतानाच प्रमुख श्रीपूजक गुरव पुजारी, नित्य वारकरी सेवेकरींची लगबग सुरू झाली ती मंदिराचे गर्भगृह सजविण्यासाठी. महापूजेची तयारी झाल्यानंतर मंजुळ भूपाळीच्या स्वरात श्रींचे पंचामृत स्नान, विविध रंगातील व सुगंधित जलस्नान, तसेच विविध रंगातील आणि स्वादातील श्रीखंड स्नान झाले. त्यानंतर सर्वांनी श्रीमल्हारी मार्तंडावर भंडार्‍यासोबतच विविध रंगांची  उधळण  केली. 
 
दरवर्षीप्रमाणे मेघमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने उत्सवाची जबाबदारी पार पाडण्यात आली. श्रीमार्तंड देवसंस्थानच्या वतीने नैसर्गिक रंग उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी अण्णाश्री उपाध्ये गुरुजी व वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी गुरुजी यांनी विविध पूजा व रुद्रावर्तन केले. पुजारी  वर्गाच्या वतीने चेतन सातभाई, बापू सातभाई, महेश बारभाई, तर नित्य वारकरी जालिंदर खोमणे, किरण कुदळे, सोमनाथ उबाळे उपस्थित होते. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने व्यवस्थापक आशिष बाठे, बाळा खोमणे आणि गणेश डीखळे यांनी संपूर्ण उत्सव पार पाडण्यासाठी सहकार्य केले. तसेच पुण्यातील रंगावलीकार सौ. आशा खुडे यांनी मध्यगर्भगृहामध्ये श्रीमार्तंडाची पोट्रेट रांगोळी काढली.

Related Articles